माझा जन्म
जानेवारी १९७४ चा आणि तुझा त्याच जूनमधला, त्यामुळे आज उणीपुरी साडे एक्केचाळीस वर्षं
झाली तुझ्या-माझ्या घट्टघट्ट मैत्रीच्या बंधांना...अखंडपणे तेवत असलेल्या आपल्या या
मैत्रीच्या शांत आणि समंजस समईला...यात कुठेही भपका नाही, अवास्तव आणि अवाजवी प्रदर्शन
नाही, अहमहिका नाही कि स्पर्धा नाही...कित्येक सुखदुःखाचे क्षण आपण सोबत आहोत.
१९४४ सालापासून
तुम्ही ढाकेफळकर आणि आम्ही थिटे कुटूंबं सख्खे शेजारी...तुझे बाबा म्हणजे आमचे उल्हासकाका
आणि माझे दिवंगत बाबा हेदेखिल बालमित्र...त्यांच्या त्या मैत्रीचा जसाच्या तसा कित्ता
आपणही गिरवलाय...त्यांच्यासारखंच समोरच्या नगर डिस्ट्रीक्ट कोर्टात बेधुंद होऊन आपण
क्रिकेट खेळलोय, तिथल्या शेकडो वर्षांच्या जुन्या चिंचेच्या झाडांच्या चिंचा त्यांनी
जश्या पाडून त्या दात आंबेपर्यंत खाल्ल्यात तश्याच आपणही चाखल्यायत्, त्या दोघांनी
त्यांचा तो कोवळा हिरवाग्गार पाला जसा ओरबडून खाल्लाय तस्साच आपणही मनमुराद खाल्लाय,
त्या उंच भिंतींवरुन चोर-पोलिस खेळत आपणही त्या दोघांसारखंच बिनधास्तपणे सुसाट पळालोय,
आतल्या ग्राऊंडवर सुसाट सायकल्स चालवल्यायत्, हनुमान जयंतीला तिथे वडाच्या झाडाखाली
असलेल्या मारुती मंदिरात सूर्योदयालाच जाऊन हनुमानजन्माच्या सुंठ-साखरेच्या प्रसादाचं
यथेच्छ भक्षणही केलंय...त्या दोघांच्या मैत्रीचे प्रत्येक क्षण आपल्या निमित्तानं कदाचित्
असे रिवाईंडही झालेयत्.
तुझ्या कुटूंबात
तुझे आजोबा, काका, चुलत भाऊ असे सगळेचजण वकील, न्यायाधिश असल्यानं सुट्टीच्या दिवशी
कोर्टातल्या ग्राऊंडवर आपल्याला मुक्त प्रवेश मिळायचा. शिपाईही लटक्या रागानं 'पोरांनो
इथे खेळू नका रे' असं सांगून होईल तेवढा काणाडोळा करुन निघून जायचे. त्यांच्या एकंदरीतच
दरडावण्यामागे, 'पोरांनो इथे खेळा पण काचा फोडणं वगैरे नासधूस करु नका रे' असाच भाव
असायचा. तुझ्या या फॅमिली बॅकग्राऊंडचा आपण सगळ्यांनीच फार फार भाव खाऊन घेतलाय.
अभिजित, तू
आणि मी पाचवीमधे एका शाळेत आलो. त्यापूर्वी चौथीपर्यंत तू होतास विश्रामबागेत आणि मी
नवीन मराठीमधे...पण आपले मित्र तेंव्हापासून ते आजतागायत् एकच...आवड आणि उदरनिर्वाहासाठी
दहावीनंतर आपल्या शैक्षणिक वाटा बदलल्या. तू वाणिज्य शाखा निवडून आयसीडब्ल्यूए केलं.
ते चालू असताना रणजित जाधव आणि तू झटून केलेल्या अभ्यासाचा मी 'यावत् जिवेत्' साक्षिदार
आहे. कधीकधी मॅथेमॅटीक्ससाठी तुम्ही मला हाक मारायचात. अर्थात् त्यासाठी माझी तुम्हाला
किती मदत व्हायची हा भाग अलहिदा...
तुझ्या स्वभावाप्रमाणेच
तुझी बॅटींगही चिवट...पक्की स्ट्रेट् बॅट्! काही केल्या तू आऊटच व्हायचा नाहीस. सचिनसारख्या
लॉन्ग सिक्सर्स तू कधीही मारल्या नाहीस. पण गली, कव्हर, थर्डमॅनला हळूच बॉल ढकलून चोरट्या
सिंगल्स-डबल्स काढण्यामधे तू अगदी माहीर होतास. तुला आऊट करण्यासाठी तुझ्यावर निरनिराळे
प्रयोग करुन आपल्यातले भलेभले बोलर्स थकून जात. फ्लाईट दिलेला तुझा ऑफ-स्पिन बॅट्समनला
आमिष दाखवत क्रिझच्या बाहेर खेचायचा आणि मग त्याला फसवून तो बॉल विकेटकिपरच्या हातात
जाऊन आपण स्टंप्ड् आऊट कधी झालोय हे त्या बॅट्समनलाही कळायचं नाही. दिवाळीत किल्ला
करणं, संक्रांतीच्या आधी महिनाभर मांज्या सुतवणं आणि विहीरीशेजारच्या छपरावरून पतंग
उडवणं, गणपती उत्सवात 'हर्ष बाल गणेश मंडळात' धावपळ करणं हे सगळं सगळं आपण कमालीच्या
उत्साहानं आणि एकदिलानं केलंय.
तुझ्याकडे
कितीतरी जादुई गोष्टी पहात आलोय मी. त्यापैकी माझ्या मनात आजही खोलवर असलेली वस्तू
म्हणजे तुमच्या पुढच्याच खोलीत (तुझे आजोबा भाऊसाहेबांच्या ऑफीसमधे) असलेलं आणि 'अमर
अकबर ऍन्थनी' मधे 'माय नेम इज ऍन्थनी गॉन्साल्विस' या गाण्याच्या सुरुवातीला ज्या अंड्यातून
अमिताभ बच्चनजी बाहेर येताना दाखवलेत अगदी तस्संच उघडणारं तुझ्या आजोबांचं अद्भूत-उंची
शिसवी लाकडाचं-काळंकुळकूळीत-चकचकीत-रुबाबदार टेबल. महागडी असलेले असंख्य फर्निचर पिसेस्
त्यानंतर माझ्या पहाण्यात आले, पण तुमच्याकडे असलेल्या त्या टेबलाची तुलना, सर कश्यालाच
नाही.
संपूर्ण जगभरात
ज्यांची भक्तमंडळी आहेत त्या अवतार मेहेरबाबा या संतांशी पहिलीवहिली ओळख झाली तीही
तुझ्यामुळेच...तुझे आजोबा मेहेरबाबांच्या अंतःस्थ शिष्यांपैकी एक होते हे पुढे जाणत्या
वयामधे कळालं. त्यामुळे तुमच्या घरात मेहेरबाबांच्या हसतमुख आणि तेजस्वी छबीची छायाचित्र
पहातच मी लहानाचा मोठा झालोय.
आपल्या दोघातल्या
मैत्रीचा एक समान धागा म्हणजे पुस्तकं...भरीस भर म्हणजे तू पहिल्यापासूनच शांत, समंजस
आणि अभ्यासू असल्यानं आपल्या आधीची आणि कदाचित् आपलीही पिढी ज्या पुस्तकांवर लहानाची
मोठी झालीये, त्या Ayn Rand च्या ‘Fountainhead’ आणि ‘Atlas Shrugged’ सारख्या पुस्तकांचा
बाहेरच्या खोलीतल्या आडव्या बाकावर लोळत-डोक्याखाली उशी घेऊन फडशा पाडताना दहावीच्या
सुट्टीतच मी तुला पाहिलंय. चितळे रोडवरच्या अहमदनगर जिल्हा वाचनालयात जाऊन तिथल्या
भल्या मोठ्या काचेच्या कपाटांमधून पुस्तकं काढून, एका बैठकीत आपण ती 'खाऊन' टाकलेलं
आजही माझ्या डोळ्यांपुढे स्पष्टपणे तरळतंय...वाळवीच होतो नाही तेंव्हा आपण त्या अर्थानं...आजही
तुझ्या वाचनाच्या या आवडीत तसूभरही घट झालेली नाहीये ही किती आनंदाची बाब आहे. तुझ्या
धावपळीच्या कामामधेही तू ती आवड अत्यंत मनापासून जपून ठेवलीस...छान...
एखादी वस्तू
जपून, जबाबदारीनं कशी जतन करावी हे मी तुझ्याकडूनच शिकलोय अभिजित. दहावी झाल्यानंतर
तुला विकत घेतलेली २४ इंची सायकल नित्यनियमानं आणि त्याच्या प्रत्येक स्पोकसकट आरश्यासारखी
स्वच्छ करताना मी तुला या डोळ्यांनी पाहिलंय. आणि मग त्यानंतर मीही तुझं अनुकरण अनेक
बाबतीत करायला शिकलो.
अभिजित, तुझ्या
सतारवादनावर जर मी काही बोललो नाही तर या सगळ्या लेखनप्रपंचालाच एक अपूर्णत्व येईल.
बाबांकडून आणि नंतर पुण्यातल्या तुझ्या गुरुदेवांकडून तू सतार या प्रसन्न व्हायला आणि
त्यामुळेच वाजवायलाही अत्यंत कठीण अश्या वाद्यावर तू कमालीच्या परिश्रमानं कौशल्य मिळवलंस.
लहानपणापासूनच तुझा त्या वाद्याकडे असलेला कल मला ठाऊक आहे. तुमच्या किंवा आमच्या घरी
त्या लखलखीत ग्रामोफोन्सवर आपण पं. रविशंकरांच्या कितीतरी रेकॉर्ड्स ऐकल्यायत्. शास्रीय
संगीतातली तुझी गती आणि तुझा पक्का असलेला कान मला माहितीये.
अभिजित, कॅरमवरचं
तुझं प्रभुत्वही वाखाणण्यासारखं आहे. उजवी तर्जनी आणि अंगठ्याच्या साह्यानं आणि खास
तुझ्या पद्धतीनं उरलेली तीनही बोटं मोराच्या पिसा-यासारखी बोर्डवर पसरुन ठेऊन मध्यभागी
असलेल्या सोंगट्या हलकेच कट्स मारुन पॉकेटमधे पाडताना मी तुला पाहिलंय. तुझ्या आवडीच्या
त्या आकाशी रंगाच्या पात्तळश्या स्ट्राईकरनं जोरदार परंतु अस्खलित रिबाऊंड्स घेतानाच्या
क्षणांचाही मी साक्षिदार आहे.
रंगपंचमीच्या
दिवशी आपली नेमकी वार्षिक परीक्षा चालू असायची. आपण घरी येईपर्यंत आपल्यासाठी रंगांच्या
बादल्या भरुन समोरच्या तुळशी वृंदावनापाशी तयार असत. मग पुढच्या दिवशीच्या पेपरचा अभ्यास
करुन सगळी दुपारीभर आपण सगळ्यांनी मिळून खेळलेले रंग आजही मनावर पक्के आहेत...काळ त्यांना
आजही फिकट करु शकलेला नाहीये अभिजित...हाच काळ सगळ्यांवर औषध असतो असं म्हणतात, पण
आपल्या मैत्रीच्या त्या गडद रंगांवर परिणाम करण्याचं सामर्थ्य काळामधे नाही...नक्कीच
नाही...
(समीर अनिल थिटे)

अनमोल!
ReplyDeleteज्यांची हृदये झाडांची..
त्यांनाच फक्त फुले येतात्...
हा माझा जिवभावाचा मित्र उद्या माझ्यावर चार अाेळी लिहील असं स्वप्नात देखील वाटल नव्हत त्याच्या बराेबर अंगतपंगत करताना...
Stay blessed bro!