त्या पहिल्या दिवशी देशपांडेबाईंनी आमच्या सगळ्यांना 'कोणी कुठे बसायचं' ते सांगितलं आणि त्याप्रमाणे मग अनुप आणि संजोग शेजारीशेजारी बसू लागले. अनुपचं मिठाईचंच दुकान असल्यानं हा पठ्ठया रोज डब्यात गोडधोड आणायचा आणि मग त्याच्या डब्याला गोडाला चटावलेले माझ्यासारखे मुंगळे लागायचेच. विरुद्धपक्षी संजोगच्या डब्यातले कुरकुरीत खाकरे आणि चटकदार पापडकी चुरीही तेवढीच आवडीची होऊन बसली. त्यांचा स्वाद आजही माझ्या जिभेवर तेवढाच ताजा आणि पक्का आहे.
माझा ठाम विश्वास आहे की शाळेच्या त्या पहिल्या दिवशीच त्या दोघांच्या परममैत्रीचं बी असं काही घट्ट रुजलंय् की त्याला ना सुखाच्या प्रसंगांची बाधा आली ना दुःखाच्या झंझावातांची...अतिशयोक्ती नाही करणार मी पण जगाच्या सगळ्या व्यावहारिक समीकरणांपल्याड त्यांची मैत्री केंव्हाच जाऊन पोहोचलीये. जखम होते एकाला आणि पाणी येतं दुस-याच्या डोळ्यांत अशी आदर्श मैत्री आहे दोघांची...दुःख आणि यत्किंचितही वेदना यांचा वाराही मित्राला लागू नये यासाठी दोघंहीजण सदैव दक्ष...
या दोघांचा स्वभाव एवढा मोकळा आहे की केवळ बालमैत्रीला स्मरुन हे दिलखुलासपणे प्रत्येकाची टर उडवत जातात...ज्याची टर उडवली आहे तो आणि आजूबाजूला जमलेल्यांमधून मग हास्याची कारंजीच नव्हे तर 'धबाबा आपटे तोय' असं समर्थ रामदासस्वामींनी वर्णन केल्यासारखे धबधबे कोसळू लागतात...दोघंही कमालीचे हजरजबाबी, त्यामुळे प्रत्येक वाक्यावर यांच्याकडे काहीतरी अफलातून उत्तर तयार असतं...असो...
या दोघांचा स्वभाव एवढा मोकळा आहे की केवळ बालमैत्रीला स्मरुन हे दिलखुलासपणे प्रत्येकाची टर उडवत जातात...ज्याची टर उडवली आहे तो आणि आजूबाजूला जमलेल्यांमधून मग हास्याची कारंजीच नव्हे तर 'धबाबा आपटे तोय' असं समर्थ रामदासस्वामींनी वर्णन केल्यासारखे धबधबे कोसळू लागतात...दोघंही कमालीचे हजरजबाबी, त्यामुळे प्रत्येक वाक्यावर यांच्याकडे काहीतरी अफलातून उत्तर तयार असतं...असो...
मित्रांनो, तुमच्या या परममैत्रीला साष्टांग दंडवत करुन या दोन ओळी तुम्हाला अन् तुमच्या गाढ मैत्रीला समर्पित करतोय...गोड मानून घ्या रे...तुमची मैत्री माझ्या लेखणीच्या मर्यादेत मावायची नाही हे मला पक्कं माहितीये, पण तरीही लिहायचं धाडस करतोय...
मैत्र
काय पण हा 'अनुप' असा
'संजोग' जुळून आलाय,
देवाधिदेवानं आम्हा सगळ्यांनाच
मैत्रीचा एक आदर्श दाखवलाय...१
बालपणापासूनच तुम्ही एकत्र वाढलात
सुखासोबत दुःखाचेही क्षण पचवले,
ढालीसारखे धाऊन गेलात पुढे
आणि एकमेकांवरचे वारही झेलले...२
सावलीसारखी एकमेकांची सोबत आहे
म्हणून तुम्हाला कश्याकश्याचंही भय नाही,
पाठीवर एकमेकांचा हात असला की
तुम्हाला अन्य कश्याची इच्छाही नाही...३
देह बदलले, तुम्ही नावंही बदलली
जन्मजन्मांच्या अथक चक्रात फिरताना,
तुमची मैत्री मात्र तसूभरही घटली नाही
स्थळकाळवेळात बदल घडताना...४
काय सांगू आणि कसं सांगू
पहा हे आमचंच सौभाग्य कसं उजळलंय,
पूर्वपुण्याईच आमची फळाला आलीये
म्हणून तुमचं 'मैत्र' पहायला मिळालंय...५
एकच मागणं परमेश्वराच्या चरणी
मागून घेईन केवळ तुम्हा दोघांसाठी,
सुख माझं जावं उडून तुमच्या दिशेनं
दुःख तुमचं उरावं शेवटी माझ्यासाठी...६
(समीर अनिल थिटे)

No comments:
Post a Comment