Thursday, June 16, 2016

निर्मळ मनाचा संशोधकः आनंद राजहंस



मला दिवस आठवतायत ते साधारण १९८० ते ८४ च्या दरम्यानचे! आम्ही सगळे मित्रमैत्रिणी तेंव्हा 'नवीन मराठी शाळा, नवीपेठ, अहमदनगर' मधे शिकत होतो. माझ्या शेजारी तेंव्हा एका बाजूनं बसायचा संभाजी वाघ आणि दुस-या बाजूनं आनंद राजहंस! इयत्ता पहिलीमधे शाळेत आम्हाला काळी स्लेट पाटी आणि पांढरी पेन्सिलच काय ती वापरायला परवानगी असे. दुसरीमधे केवळ शिसपेन्सिल आणि तिसरीपासून पुढे मग शाईचा पेन! त्या शाईच्या पेननं आम्हाला विद्यादान देऊन स्वच्छ चारित्र्याचे पाठ जरी शिकवले असले, तरीही आमच्या हातांना, कपड्यांना, वह्यापुस्तकांना मात्र बालवयातच काळा रंग फासून ठेवण्याचे अघोरी कृत्यंही करुन ठेवलेलं आहेच. 

चित्रकलेचा तास सुरु झाला कि तीनचार अगदी अष्टावक्रच असे ते डोंगर, त्यातून कुणीतरी खाली बळजबरीनं ढकलून दिल्यासारखा वहाणारा नदी नावाचा वाकड्यातिकड्या आडमुठ्या रेषांचा प्रवाह, त्यात तरंगणारी नाव, त्या नदीत गुण्यागोविंदानं एकत्र रहाणारे कासव – मगर - भरीस एक शार्कमासाही आणि चित्र काढताना ऐनवेळी आठवतील ते सर्व जलचर, नदीत पोहणारी बदकं, डोंगरांवर मराठीतल्या चारच्या आकाराचे उडणारे आणि अनेक दिवस उपासमार झाल्यासारखे पक्षी एवढा कोणत्याही जनरल स्टोअर्समधे विकत मिळणारा सगळा जिन्नस मी पाटीवर काढून ठेवायचो. याहीपुढे जाऊन कधीकधी डोंगरांमधून अर्धवट उगवलेल्या त्या सूर्यनारायणाला दोन डोळे, कपाळावर गंध आणि गलमिश्या काढण्यापर्यंतही माझा कल्पनाविलास भरारी मारीत असे. ही असली चित्रं काढून त्यांना रंगीत खडूंनी रंग देण्याच्या नावाखाली मांडीवर असलेल्या त्या पाटी नावाच्या कॅनव्हॉसवर मी यथेच्छ गोंधळ घालून ठेवित असे. पुढे जसजसा वरच्या वर्गात गेलो तसतशी मला मिळत गेलेल्या चित्रकलेच्या माध्यमांमधे केवळ वडीलांच्या कृपेनंच सुधारणा होऊन पाटी-खडूच्या ऐवजी कागद-रंगपेट्या विनासायास मिळाल्या. पण 'मुळात आडातच नसल्यानं पोह-यात तरी कुठून येणार?' या सत्यामुळे माझ्या चित्रकलेतली प्रगती काही फार जोमानं झाली नाही...पण अजूनही मनात एक खेद आहेच, 'जर योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळालं असतं तर या माझ्या मातृभूमीला अजून एक रवी वर्मा नक्कीच मिळाला असता.' असो! आज स्वतःचं हेच दुःख कुरवाळत बसण्यापलिकडे मी काय करु शकतो?

हे सर्व चालू असताना, शेजारी बसणारा माझा बालमित्र आनंद राजहंस मात्र अत्यंत एकाग्रतेनं रणगाडे, विमानं, हेलिकॉप्टर्स, पाणबुड्या, रॉकेट्स, युद्धनौका अशी वाहनं आणि त्यांच्यातले निरनिराळे भाग किंवा यंत्रं यांचं अगदी तपशिलवार वर्णन असलेली चित्रं काढीत असे. मी त्याच्या शेजारीच बसत असल्यानं ते भाग काय - काय कामं करतात हेदेखील आनंद मला समजावून सांगत असे. 

आनंद राजहंस जन्मजात इंजिनियर आहे. अभियांत्रिकी आणि त्याची उपयोजकता त्याच्या हाडामासात खिळलेली आहे. शाळेत असल्यापासूनच तो यंत्रं तयार करताना मी त्याला पाहिलंय. माझे बाबा आणि त्याचे बाबा दोघंही अगदी जवळचे मित्र! त्यात नगरमधे आम्ही अजूनही एकाच कॉलनीत रहात असल्यानं त्याच्या घरी मी जात असे. घराच्या गच्चीवर त्यानं तयार केलेलं हवामानसूचक यंत्र मी पाहिलंय. टेराकोटा माती भाजून त्यानं तयार केलेल्या - निरनिराळे सूर काढणा-या जादूई शिट्ट्य़ा मी पाहिल्यात. त्याच्या खोलीत सर्वत्र पसरलेली यंत्रं, त्यांचे सुटे भाग मी पाहिलेत. नगरमधल्या मंगळवार बाजारात हिंडून विकत घेतलेल्या सुट्या भागांपासून त्यानं तयार केलेली निरनिराळी यंत्रं पाहून मी हरखून जात असू. त्याची अशी ती अनेक संशोधनं मी पाहिलियेत. इंजिनियरींग झाल्यावर त्यानं आयआयटी - मुंबई मधून 'मास्टर ऑफ डिझाईन' ही पदवी मिळवली. त्याचसोबत रॉटरडॅम स्कूल ऑफ मॅनेजमेंट आणि इरॅस्मस विद्यापिठातून व्यवस्थापन विषयातील शिक्षणही त्यानं घेतलं. 

स्वतःच्या ज्ञानाचा लाभ मायभूमीला व्हावा यासाठी जगभरातील अनेक प्रथितयश बिझनेस ग्रुप्समधे उच्च पदांवर काम केल्यानंतर तो नुकताच पुण्यात स्थायिक झालाय. परदेशात व्यावसायिक यश मिळूनही स्वतःच्या मातीशी नाळ न तोडणारी हाताच्या बोटावर मोजता येतील अश्या काही व्यक्ती असतात, त्यातच आनंदचं नाव घ्यावं लागेल. शाळेत असताना तो जसा साधा होता, अगदी तसाच आजही आहे. परमेश्वरानं कुशाग्र बुद्धीमत्ता आणि यश भरभरुन दिलेलं असतानाही आनंद कमालीचा नम्र आहे. संशोधन क्षेत्रात काम करणा-या व्यक्तींचे आभार माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसानं कसे मानावेत हेच कळत नाही. या संशोधकांनी माझं जगणं किती सोपं करुन ठेवलंय ना! रबरबॅन्डसारखी वस्तू तसं पहायला गेलं तर किती साधी दिसते, पण जर ती कधी कोणी शोधूनच काढली नसती तर आज तिच्याविना जगणं किती अवघडल्यासारखं झालं असतं असा विचार मी या क्षणाला करतोय. 

जिथे सगळं बालपण गेलं, इंजिनियरींग पर्यंतचं शिक्षण झालं, त्या नगर शहरामधेच आनंदनं त्याच्या मित्रांसह नुकताच एक सायकल्सचा कारखाना काढलाय. या कारखान्यात तो स्वयंचलित सायकल्सची निर्मिती करतोय. विद्युत ऊर्जेवर चालणारी ही सायकल म्हणजे त्याच्या अभियांत्रिकी ज्ञानाची कमाल आहे. सर्वसामान्य सायकलसारखीच ही सायकल आपण चालवू शकतो. मात्र त्यात एक सोय अशी आहे कि त्या सायकलची एक विशिष्ट कळ दाबली कि सायकल एखाद्या स्वयंचलित वहानासारखी पळायला लागते. 

कालच संध्याकाळी मी या सायकलची टेस्ट राईड घेऊन आलोय. मस्त अनुभव होता. मागाहून विचार करताना असं जाणवलं कि सतत होणारी इंधन दरवाढ हा तर आपल्या फार जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्याचबरोबर तासन् तास संगणकासमोर बसून काम करणंही आता अटळ झालंय. पण त्यामुळे शरीराला कोणतीही हालचाल न मिळाल्यानं निर्माण होणा-या अनेक मानसिक आणि शारिर व्याधींसारख्या अनेक त्रासदायक मुद्द्यांचा विचार करता, विद्युत ऊर्जेवर चालणारी ही सायकल वरदानच आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे पेट्रोल-डिझेल यासारखं कोणतंही इंधन ही सायकल वापरीत नसल्यानं परिणामी तिच्यातून कोणतेही विघातक वायू वातावरणात पसरत नाहीत आणि सहाजिकच ही सायकल पर्यावरणाशीही सख्य साधणारीच आहे. सायकलिंग हा एक उत्तम व्यायाम तर आहेच आणि त्याचे अनेक दृश्य - अदृश्य वैद्यकीय फायदेही आहेत. 

धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या या काळात आपला पोटचा लेक किंवा लाडकी कन्या शाळा / कॉलेज संपल्यावरही अनेक क्लासेसना जात असतात. वेळेची बचत करण्यासाठी आपण त्यांना वहानंही विकत घेऊन देत असतो. मात्र, पोटचा गोळा घरी परत येईपर्यंत आई - बाबांच्या जीवात जीव नसतो. न कळत्या वयात हातात पडलेल्या स्वयंचलित वहानांच्या गतीवर नियंत्रण ठेवणं शक्य न झाल्यानं (गतीची आवड हा त्यांचा नाही, तर त्यांच्या वयाचा दोष असतो) घडलेल्या अपघातांचं प्रमाण सध्या वाढत चाललेलं आपण पहातोय. मात्र या सायकलचा वेग ताशी २५ किमी असल्यानं गतीवर नियंत्रण ठेवणं अगदी सहजशक्य आहे. तसंच, ही सायकल जरी स्वयंचलित असली तरीही ती चालवण्यासाठी आरटिओकडून कोणताही परवाना काढण्याची किंवा रस्ता कर भरायचीही आवश्यकता नाही.

'
नगर शहरातल्या वसंत टेकडी भागात या सायकलचं शोरुम काढलंय' हे सांगण्यासाठी परवा आनंदचा फोन आला होता. फोनवर बोलताना तो अगदी सहजपणे बोलून गेला, "समीर, टेस्ट राईडसाठी ये आणि सायकलमधे काही सुधारणा सुचवायच्या असतील तर अवश्य सुचव!" मी मघाशीच म्हटलंय ना कि एवढं ज्ञान - यश मिळवूनही आनंद कमालीचा नम्र आहे, हा त्याचाच एक दाखला! आनंदनं तयार केलेल्या उत्पादनात मी सुधारणा सुचवायच्या म्हणजे सचिन तेंडूलकरला गल्लीतल्या क्रिकेटरनं बॅट कशी पकडायची किंवा केकत जवळगे बुद्रुक तत्सम नावाच्या आणि आडबाजूच्या गावातल्या शाळेत आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकवणा-यानं प्रा. अमर्त्यकुमार सेन यांना अर्थशास्त्र शिकवल्यासारखंच नाही का! 

किरकोळ यशानंच जमिनीवरुन पाय सुटलेली माणसं आजूबाजूला पाहिल्यावर हे असे सद्गुण ठळकपणे जाणवतात. निम्म्याहून अधिक पृथ्वी प्रदक्षिणा घातलेल्या आनंदला मी सुमारे दोन आठवड्यांपूर्वी एका वैयक्तिक कारणासाठी ईमेल केला होता, त्यावर त्याचा मला फोन आला. सुमारे अर्धा तास तो बोलत होता. फोनवर त्यानं मला जो सल्ला दिला तो ऐकल्यावर माझ्या प्रश्नावरचं उत्तर तर मला मिळालंच, पण त्याचा ‘जागतिक वाचकाची मानसिकता आणि तत्संबंधित अर्थकारण’ याबाबतीतलाही अभ्यास पाहून मी थक्क झालो. त्यानं सांगितल्यानुसार मग मी मला हव्या असलेल्या क्षेत्राविषयीची माहिती नेटवरुन मिळवली. अर्थात्, हे सर्व श्रेय आनंदच्या कमालीच्या साध्या आणि नम्र स्वभावाला मनोमन देऊन मी मोकळा होतोय.

असा हा संशोधक वृत्तीचा आनंद माझा बालमित्र आहे, ही बाबच माझ्यासाठी अत्यंत आनंददायक आणि अभिमान वाटावा अशी आहे. परमपिता परमेश्वर त्याच्या संशोधन कार्यात सर्वोच्च यश देईल यात शंकाच नाही.
(समीर अनिल थिटे)

************************************************************************************

No comments:

Post a Comment