Friday, June 17, 2016

मायाचित्रकारीतेतला शिलेदारः अभय कोहोक...



असं म्हणतात की जगात अशी एकही जागा नाहीये जिथे सूर्यंकिरणं पोहोचू शकत नाहीत...मग तो हजारो फॅदम्स् खोल असलेला समुद्रतळ असो वा माणसाला अजूनही अज्ञात असलेले कित्येक Virgin Lands असोत...अश्या या सूर्यनारायणालाही जे दिसू शकत नाही ते दिसतं कवी/लेखकांना...'जे न देखे रवी, ते देखे कवी'...पण होतं काय तर आपलं म्हणणं वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कवी/लेखकांना पानंच्या पानं भरवावी लागतात, शब्दांना लेखणीशी धरुन चमत्कृती / कसरती / कोलांट्या उड्या माराव्या लागतात. त्या तुलनेत छायाचित्रकार काकणभर सरसच आणि नशिबवानही...कारण त्यांना काय 'म्हणायचंय' ते एखाद्या सुंदर छायाचित्राच्या सहाय्यानं ते आपल्याला चटकन् आणि अधिक प्रभावीपणे सांगू शकतात.

अभय कोहोक हा माझा छायाचित्रकार असलेला परममित्र...

मी आता आजपासून त्याला छायाचित्रकार म्हणणं सोडून देणार आहे आणि 'मायाचित्रकार' असंच म्हणणार आहे. कारण कधी नैसर्गिक तर कधी कृत्रिम छाया-प्रकाशाचा (Light and Shadow) खेळ तर तो खेळतोच पण त्या खेळात तो एवढा मुरब्बी आहे की त्याची छायाचित्रं पहाताना मला तर माझ्याभोवती महाभारतातल्या त्या मयासूराची मयसभाच उभारलेली दिसू लागते.

म्हणजे वानगीदाखल अभयचं हे केळीच्या पानाचं मायाचित्र पहा (छायाचित्र नव्हे)...जशी मला त्यात Spiral Staircase दिसली तशी पहाणा-या प्रत्येकाला आपापल्या संवेदनशीलतेनुसार त्यात निरनिराळे आकार दिसतील...

अभय माझा बालमित्र...एका वाक्यात जर त्याचं वर्णन करायचं असेल तर मी म्हणेन ‘A man of few words, whose photography chats a lot...’ इथे chat हा शब्द मी जाणिवपूर्वक वापरलाय कारण ती मायाचित्रं आपल्याशी मनसोक्त गप्पा मारतात...

या अभयचा बालपणापासूनच वैज्ञानिकाचा पिंड ...तेंव्हापासूनच भौतिकशास्त्रात तर त्याला कमालीचा रस आणि गतीही होती...आठवीत असताना त्यानं 'प्रकाशाचं परावर्तन' हा धडा मला असा काही भन्नाट समजावून सांगितला होता की त्यानं सांगितलेल्या पद्धतीनंच मी परवा माझ्या लेकालाही तो झक्कपैकी शिकवू शकलो (आणि त्याला तो 'समजला' हे माझंच नशिब)...सहाजिकच अभय आज आयुकामधे त्याच्या आवडीचं काम करतोय.

पण त्याहूनही त्याची मायाचित्रकारीता मला अधिक भावते. काय अफलातून मायाचित्रं खेचतो तो...जेंव्हा जेंव्हा शक्य असतं तेंव्हा तेंव्हा मी त्याच्या त्या मायाचित्रांवर कमेंट्दाखल दोन पद्य ओळी लिहून त्याचा गौरव करत असतो...

अभय...तुझी ही मायाचित्रगिरी अशीच चालू ठेव आणि आमच्या डोळ्यांना ढेकर येईतो मेजवानीच्या प्रसंगांसाठी पुन्हापुन्हा निमंत्रण देत रहा...शुभेच्छा!

(समीर अनिल थिटे)

Thursday, June 16, 2016

पंख नसलेला देवदूतः वैद्य मंदार भणगे

मंदार म्हणजे सडेतोड-रोखठोक बोलणारा, मंदार म्हणजे 'देववाणी' संस्कृत भाषेचा प्रेमी, मंदार म्हणजे संगीतशास्त्राची उत्तम जाण असलेला रसिक, मंदार म्हणजे एक सुरेल गायकही, मंदार म्हणजे जीभेचे चोचले यथेच्छपणे पुरवणारा एक खवय्याही...हे झालं समाजाचं त्याच्याबद्दलचं वर्णन पण जर त्याच्याच शब्द ते ऐकायचं असेल तर "मी म्हणजे अ तुकडीतला ढ विद्यार्थी" ... हा असा त्याचा रोखठोकपणा...आडपडदा नसलेलं व्यक्तिमत्व...

आपल्याकडे 'देवदूत' ही संकल्पना नाही...आपण ती पाश्चात्त्यांकडून घेतली. आपल्या संस्कृतीमधे यक्ष-किन्नर-चारण-विद्याधर-गंधर्व इ. देवयोनींचं वर्णन आहे. परमपिता परमेश्वर या देवयोनींसाठीही दुर्लभ आहे...कारण त्या केवळ 'भोग योनी' आहेत. स्वर्गामधे वर्णन केलेले नानाविध सुखभोग भोगण्यासाठीच त्या योनी आहेत. परमेश्वराचं दर्शन आणि त्याची प्राप्ती करुन घेण्यासाठी देवयोनीत असलेले हे पवित्र आत्मेही मनुष्यजन्म घेतात कारण केवळ मनुष्यजन्मातच भगवत्प्राप्ती आहे. पण जे जे चांगलं आहे ते मनापासून स्विकारणं हेच तर प्रगतीपथावर असलेल्या आत्म्याचं प्रमुख लक्षण आहे. आणि म्हणूनच आपण देवदूत ही संकल्पना स्विकारली.

मंदार आमच्यासाठी 'देवदूत' आहे...'पंख नसलेला देवदूत' आहे. का ते यथावकाश सांगेनच.

मंदारची आणि माझी ओळख अगदी बालपणीच झाली. चारुदत्त जोशीची आई - मंदार भणगेची आई आणि माझी आत्या या अगदी जवळच्या मैत्रिणी...आत्यासोबत त्यांचं आमच्या घरी नित्य येणंजाणंही असायचं. त्यामुळे शाळेत ओळख होण्याआधीच माझी चारु आणि मंदारशी ओळख झाली.

त्याही वयात उंचापुरा असलेला चारुदत्त घरी येऊन गेला की आजीचा एक धपाटा खावा लागे - घरातल्या इतरांकडून मला नाहीनाही ते ऐकावं लागे - प्रत्येकजण मग माझा उद्धार करण्याची संधी हातची जाऊ देत नसे, "समीर, अरे बघ जरा त्या चारुकडे...तुझ्याच वयाचा ना तो...बघ कसा उंचापुरा अन् दणकट आहे तो...नाहीतर तू...दर चार दिवसांनी आहेच डॉक्टर लेलेंकडे तुला घेऊन जाणं..." त्यामुळे आईसोबत घरी आलेला चारु पाहिला की मी कुठेतरी लपूनच बसायचो.

आईचं बोट धरुन येणारा, पायात रंगेबीरंगी कॅनव्हास् बूट्स, चौकड्यांचा बुशशर्ट घातलेला गोरागोमटा - लालबुंद आणि आज आहे तस्साच तेंव्हाही गुटगूटीत असलेला मंदार मला आजही पक्का आठवतोय. पुढे चारू, तो आणि मी एकाच शाळेत आलो...

नवीन मराठी शाळा आणि भाऊसाहेब फिरोदीयाची १० वर्षं भर्रकन् उडून गेली. निरनिराळ्या वाटांनी सगळेजण निरनिराळ्या दिशांना निघून गेले. कोणी कुठे तर कोणी कुठे पांगले.

पण २००२ साली माझ्या लेकाच्या बाबतीत अशी काही विचित्र परिस्थिती निर्माण झाली की आई-बाप म्हणून आमच्या पायाखालची वाळूच सरकली. तत्पूर्वी एका बालरोग तज्ञानं सांगितलेलं जर सत्य मानायचं असं ठरवलं असतं तर फारच भीषण परिस्थिती निर्माण झाली असती. 'काय करावं?' या चिंतेत असतानाच देवाच्या कृपेनं मला मंदारचं स्मरण झालं. लगोलाग कोर्टगल्लीमधे असलेलं त्याचं क्लिनिक मी शोधून काढलं. आणि दिड महिन्याच्या माझ्या तान्ह्या लेकाला घेऊन मी त्याच्या उंबरठ्यावर येऊन ठाकलो...लेकाला मंदारच्या स्वाधिन केल्याक्षणीच - त्याच्या खुर्चीच्या मागे असलेल्या भगवान् धन्वंतरीच्या मूर्तीकडे पाहून आपण योग्य त्या ठिकाणी आल्याचा विश्वास निर्माण झाला. आपल्या खास शैलीत मान डोलावत मंदार आधी त्याच्याकडे एकटक पहात बसला. मग समोरच्या टेबलावर ठेवलेल्या हिरव्या रंगाच्या अंडाकृती पेपरवेट् (जो आज १४ वर्षानंतरही त्याच्या टेबलावर तस्साच आहे) खालून त्यानं एक केसपेपर काढून त्यावर त्याच्या 'अक्षरात' काहीतरी लिहिलं आणि त्यानं उपाय सुचवला.

मंदारचं हस्ताक्षर हा एक फार निराळा आणि गहन विषय आहे. मी जर एम. ए. मराठी किंवा इंग्लिश असतो तर मी नक्कीच 'बुद्धीवंतांचं अगम्य अक्षरः एक तौलनिक अभ्यास' किंवा 'Unreadability of a Brainy Person's Handwriting: A Perspective Analysis' अश्या विषयावर डॉक्टरेटसाठी प्रबंध लिहिला असता. काहीतरी लिहित असलेल्या मंदारला पहाणं हा माझ्यापुरता तरी एक मौजेचा विषय असतो. त्याला लिहिताना पाहिलं की मला फक्त आणि फक्त मोराचीच आठवण येते...सर्वांगसुंदर लाभलेल्या त्या पक्ष्याचे पाय ज्यानं निरखून पाहिलेले असतील त्यांनाच मला काय म्हणायचंय ते लक्षात येईल...निरिक्षणांती माझ्या असं लक्षात आलेलं आहे की काही अपवाद वगळता सगळ्या डॉक्टर मंडळींच्या पत्नीही (म्हणजे आपसूक पतीही) बहुदा डॉक्टर्सच असतात त्याचं कारणही तसंच ठोस असतं. कारण एका डॉक्टरनं लिहिलेलं प्रेमपत्र त्यांच्या त्या अक्षरामुळे इतर कोणी वाचूच शकणार नाही...त्यासाठी समोरची व्यक्तीही डॉक्टरच हवी...

रुग्णाला तपासण्याची मंदारची स्वतःची अशी एक खास शैली आहे. माझा ठाम विश्वास आहे की मान डोलावत असतानाच रुग्णाच्या लक्षणांचा विचार करत तो समाधी अवस्थेत जात असणार आणि त्याच trance मधे आपलं संपूर्ण ज्ञान कसाला लाऊन त्याला उपाययोजना सुचत असणार.

मंदारनं सुचवलेल्या उपायाची तात्काळ अंमलबजावणी सुरु झाली आणि शनैः शनैः लेकाच्या प्रकृतीत न भूतो न भविष्यती अशी प्रगती होत गेली. त्यानंतर २०१२ साली पुन्हा एकदा मंदार धाऊन आला. प्रसंग होता माझ्या लेकाच्या एका अवघड-गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेचा! पण मंदारनं मला धीर दिला. आणि त्याही प्रसंगामधून आम्ही सहीसलामत बाहेर पडलो खरे पण त्याच्या शरीराचं मात्र अपार नुकसान झालं. त्याची प्रतिकार क्षमता कमी झाली, ऊर्जा घटली. पुन्हा एकदा मंदारच्या उंबरठ्यावर आम्ही येऊन ठेपलो आणि त्यानं पुन्हा काही विशेष औषधांची योजना केली. त्यामुळे लेकाच्या प्रकृतीमधे कमालीचा सकारात्मक परिणाम घडून आला. मंदारच्या त्या उपाययोजनेचं वैशिष्ट्य हे की परवा झालेल्या मॅक्सीमस् मॅरेथॉनमधे लेकानं ५ कि.मी. मधे यशस्वी भाग घेतला.

या सगळ्यांचं श्रेय देण्यासाठी मी जेंव्हा जेंव्हा मंदारला फोन करतो, प्रत्यक्ष भेटीमधे त्याच्याशी बोलतो, तेंव्हातेंव्हा तो ते आयुर्वेदाला देऊन मोकळा होतो...हा त्याचा विनय, ही त्याची आपल्या विहित कर्मावर असलेली परमश्रद्धा!

तू काहीही म्हण रे मंदार आणि तुझ्या स्वभावधर्माप्रमाणे तू ते नाकारशीलही...पण गंधर्वचे आई-बाप या नात्यानं आम्हा दोघांसाठी तू एक 'पंख नसलेला देवदूतच' आहेस.

(समीर अनिल थिटे)

अभिजित ढाकेफळकर अन् मी...मैत्रीच्या चाळीशीत...


माझा जन्म जानेवारी १९७४ चा आणि तुझा त्याच जूनमधला, त्यामुळे आज उणीपुरी साडे एक्केचाळीस वर्षं झाली तुझ्या-माझ्या घट्टघट्ट मैत्रीच्या बंधांना...अखंडपणे तेवत असलेल्या आपल्या या मैत्रीच्या शांत आणि समंजस समईला...यात कुठेही भपका नाही, अवास्तव आणि अवाजवी प्रदर्शन नाही, अहमहिका नाही कि स्पर्धा नाही...कित्येक सुखदुःखाचे क्षण आपण सोबत आहोत.

१९४४ सालापासून तुम्ही ढाकेफळकर आणि आम्ही थिटे कुटूंबं सख्खे शेजारी...तुझे बाबा म्हणजे आमचे उल्हासकाका आणि माझे दिवंगत बाबा हेदेखिल बालमित्र...त्यांच्या त्या मैत्रीचा जसाच्या तसा कित्ता आपणही गिरवलाय...त्यांच्यासारखंच समोरच्या नगर डिस्ट्रीक्ट कोर्टात बेधुंद होऊन आपण क्रिकेट खेळलोय, तिथल्या शेकडो वर्षांच्या जुन्या चिंचेच्या झाडांच्या चिंचा त्यांनी जश्या पाडून त्या दात आंबेपर्यंत खाल्ल्यात तश्याच आपणही चाखल्यायत्, त्या दोघांनी त्यांचा तो कोवळा हिरवाग्गार पाला जसा ओरबडून खाल्लाय तस्साच आपणही मनमुराद खाल्लाय, त्या उंच भिंतींवरुन चोर-पोलिस खेळत आपणही त्या दोघांसारखंच बिनधास्तपणे सुसाट पळालोय, आतल्या ग्राऊंडवर सुसाट सायकल्स चालवल्यायत्, हनुमान जयंतीला तिथे वडाच्या झाडाखाली असलेल्या मारुती मंदिरात सूर्योदयालाच जाऊन हनुमानजन्माच्या सुंठ-साखरेच्या प्रसादाचं यथेच्छ भक्षणही केलंय...त्या दोघांच्या मैत्रीचे प्रत्येक क्षण आपल्या निमित्तानं कदाचित् असे रिवाईंडही झालेयत्.

तुझ्या कुटूंबात तुझे आजोबा, काका, चुलत भाऊ असे सगळेचजण वकील, न्यायाधिश असल्यानं सुट्टीच्या दिवशी कोर्टातल्या ग्राऊंडवर आपल्याला मुक्त प्रवेश मिळायचा. शिपाईही लटक्या रागानं 'पोरांनो इथे खेळू नका रे' असं सांगून होईल तेवढा काणाडोळा करुन निघून जायचे. त्यांच्या एकंदरीतच दरडावण्यामागे, 'पोरांनो इथे खेळा पण काचा फोडणं वगैरे नासधूस करु नका रे' असाच भाव असायचा. तुझ्या या फॅमिली बॅकग्राऊंडचा आपण सगळ्यांनीच फार फार भाव खाऊन घेतलाय. 

अभिजित, तू आणि मी पाचवीमधे एका शाळेत आलो. त्यापूर्वी चौथीपर्यंत तू होतास विश्रामबागेत आणि मी नवीन मराठीमधे...पण आपले मित्र तेंव्हापासून ते आजतागायत् एकच...आवड आणि उदरनिर्वाहासाठी दहावीनंतर आपल्या शैक्षणिक वाटा बदलल्या. तू वाणिज्य शाखा निवडून आयसीडब्ल्यूए केलं. ते चालू असताना रणजित जाधव आणि तू झटून केलेल्या अभ्यासाचा मी 'यावत् जिवेत्' साक्षिदार आहे. कधीकधी मॅथेमॅटीक्ससाठी तुम्ही मला हाक मारायचात. अर्थात् त्यासाठी माझी तुम्हाला किती मदत व्हायची हा भाग अलहिदा...

तुझ्या स्वभावाप्रमाणेच तुझी बॅटींगही चिवट...पक्की स्ट्रेट् बॅट्! काही केल्या तू आऊटच व्हायचा नाहीस. सचिनसारख्या लॉन्ग सिक्सर्स तू कधीही मारल्या नाहीस. पण गली, कव्हर, थर्डमॅनला हळूच बॉल ढकलून चोरट्या सिंगल्स-डबल्स काढण्यामधे तू अगदी माहीर होतास. तुला आऊट करण्यासाठी तुझ्यावर निरनिराळे प्रयोग करुन आपल्यातले भलेभले बोलर्स थकून जात. फ्लाईट दिलेला तुझा ऑफ-स्पिन बॅट्समनला आमिष दाखवत क्रिझच्या बाहेर खेचायचा आणि मग त्याला फसवून तो बॉल विकेटकिपरच्या हातात जाऊन आपण स्टंप्ड् आऊट कधी झालोय हे त्या बॅट्समनलाही कळायचं नाही. दिवाळीत किल्ला करणं, संक्रांतीच्या आधी महिनाभर मांज्या सुतवणं आणि विहीरीशेजारच्या छपरावरून पतंग उडवणं, गणपती उत्सवात 'हर्ष बाल गणेश मंडळात' धावपळ करणं हे सगळं सगळं आपण कमालीच्या उत्साहानं आणि एकदिलानं केलंय. 

तुझ्याकडे कितीतरी जादुई गोष्टी पहात आलोय मी. त्यापैकी माझ्या मनात आजही खोलवर असलेली वस्तू म्हणजे तुमच्या पुढच्याच खोलीत (तुझे आजोबा भाऊसाहेबांच्या ऑफीसमधे) असलेलं आणि 'अमर अकबर ऍन्थनी' मधे 'माय नेम इज ऍन्थनी गॉन्साल्विस' या गाण्याच्या सुरुवातीला ज्या अंड्यातून अमिताभ बच्चनजी बाहेर येताना दाखवलेत अगदी तस्संच उघडणारं तुझ्या आजोबांचं अद्भूत-उंची शिसवी लाकडाचं-काळंकुळकूळीत-चकचकीत-रुबाबदार टेबल. महागडी असलेले असंख्य फर्निचर पिसेस् त्यानंतर माझ्या पहाण्यात आले, पण तुमच्याकडे असलेल्या त्या टेबलाची तुलना, सर कश्यालाच नाही. 
संपूर्ण जगभरात ज्यांची भक्तमंडळी आहेत त्या अवतार मेहेरबाबा या संतांशी पहिलीवहिली ओळख झाली तीही तुझ्यामुळेच...तुझे आजोबा मेहेरबाबांच्या अंतःस्थ शिष्यांपैकी एक होते हे पुढे जाणत्या वयामधे कळालं. त्यामुळे तुमच्या घरात मेहेरबाबांच्या हसतमुख आणि तेजस्वी छबीची छायाचित्र पहातच मी लहानाचा मोठा झालोय.

आपल्या दोघातल्या मैत्रीचा एक समान धागा म्हणजे पुस्तकं...भरीस भर म्हणजे तू पहिल्यापासूनच शांत, समंजस आणि अभ्यासू असल्यानं आपल्या आधीची आणि कदाचित् आपलीही पिढी ज्या पुस्तकांवर लहानाची मोठी झालीये, त्या Ayn Rand च्या ‘Fountainhead’ आणि ‘Atlas Shrugged’ सारख्या पुस्तकांचा बाहेरच्या खोलीतल्या आडव्या बाकावर लोळत-डोक्याखाली उशी घेऊन फडशा पाडताना दहावीच्या सुट्टीतच मी तुला पाहिलंय. चितळे रोडवरच्या अहमदनगर जिल्हा वाचनालयात जाऊन तिथल्या भल्या मोठ्या काचेच्या कपाटांमधून पुस्तकं काढून, एका बैठकीत आपण ती 'खाऊन' टाकलेलं आजही माझ्या डोळ्यांपुढे स्पष्टपणे तरळतंय...वाळवीच होतो नाही तेंव्हा आपण त्या अर्थानं...आजही तुझ्या वाचनाच्या या आवडीत तसूभरही घट झालेली नाहीये ही किती आनंदाची बाब आहे. तुझ्या धावपळीच्या कामामधेही तू ती आवड अत्यंत मनापासून जपून ठेवलीस...छान...

एखादी वस्तू जपून, जबाबदारीनं कशी जतन करावी हे मी तुझ्याकडूनच शिकलोय अभिजित. दहावी झाल्यानंतर तुला विकत घेतलेली २४ इंची सायकल नित्यनियमानं आणि त्याच्या प्रत्येक स्पोकसकट आरश्यासारखी स्वच्छ करताना मी तुला या डोळ्यांनी पाहिलंय. आणि मग त्यानंतर मीही तुझं अनुकरण अनेक बाबतीत करायला शिकलो.

अभिजित, तुझ्या सतारवादनावर जर मी काही बोललो नाही तर या सगळ्या लेखनप्रपंचालाच एक अपूर्णत्व येईल. बाबांकडून आणि नंतर पुण्यातल्या तुझ्या गुरुदेवांकडून तू सतार या प्रसन्न व्हायला आणि त्यामुळेच वाजवायलाही अत्यंत कठीण अश्या वाद्यावर तू कमालीच्या परिश्रमानं कौशल्य मिळवलंस. लहानपणापासूनच तुझा त्या वाद्याकडे असलेला कल मला ठाऊक आहे. तुमच्या किंवा आमच्या घरी त्या लखलखीत ग्रामोफोन्सवर आपण पं. रविशंकरांच्या कितीतरी रेकॉर्ड्स ऐकल्यायत्. शास्रीय संगीतातली तुझी गती आणि तुझा पक्का असलेला कान मला माहितीये.

अभिजित, कॅरमवरचं तुझं प्रभुत्वही वाखाणण्यासारखं आहे. उजवी तर्जनी आणि अंगठ्याच्या साह्यानं आणि खास तुझ्या पद्धतीनं उरलेली तीनही बोटं मोराच्या पिसा-यासारखी बोर्डवर पसरुन ठेऊन मध्यभागी असलेल्या सोंगट्या हलकेच कट्स मारुन पॉकेटमधे पाडताना मी तुला पाहिलंय. तुझ्या आवडीच्या त्या आकाशी रंगाच्या पात्तळश्या स्ट्राईकरनं जोरदार परंतु अस्खलित रिबाऊंड्स घेतानाच्या क्षणांचाही मी साक्षिदार आहे.

रंगपंचमीच्या दिवशी आपली नेमकी वार्षिक परीक्षा चालू असायची. आपण घरी येईपर्यंत आपल्यासाठी रंगांच्या बादल्या भरुन समोरच्या तुळशी वृंदावनापाशी तयार असत. मग पुढच्या दिवशीच्या पेपरचा अभ्यास करुन सगळी दुपारीभर आपण सगळ्यांनी मिळून खेळलेले रंग आजही मनावर पक्के आहेत...काळ त्यांना आजही फिकट करु शकलेला नाहीये अभिजित...हाच काळ सगळ्यांवर औषध असतो असं म्हणतात, पण आपल्या मैत्रीच्या त्या गडद रंगांवर परिणाम करण्याचं सामर्थ्य काळामधे नाही...नक्कीच नाही...

(समीर अनिल थिटे)

डॉ. कृष्णा बलदवाः डॉक्टर ते एक softhearted पिता


जिथे आपल्याला आपल्याच शरीरात काय चाललंय ते कळणं दुरापास्त असतं तिथे दुस-याच्या शरीरात काय 'घडलंय' (किंवा खरंतर काय 'बिघडलंय') हे जाणून घेऊन त्या बिघाडावर रामबाण उपाययोजना करायची म्हणजे तर महाकठिण कर्मच नाही का? आणि त्यामुळेच तर डॉक्टरमंडळी आपल्यासाठी देवदूत असतात. म्हणूनच कदाचित् म्हणतात, Music can’t be a doctor, who can walk into our society to treat patients and so God made doctors.

अश्या देवदूतांना अर्थात् माणसांच्या रुपात वावरत असलेल्या या डॉक्टरांना त्यांनी अत्यंत परिश्रमाने मिळवलेल्या ज्ञानासोबतच (नांदेड गव्हर्नमेंट मेडीकल् कॉलेज होस्टेलमधे मित्र मनोजची ग्रे वगैरे मंडळींची 'ही भलीमोठ्ठी' पुस्तकं पाहिलीयेत मी), हातगुण आणि उत्तम अश्या देवदत्त व्यक्तिमत्वाची जर जोड मिळाली असेल तर दुग्धशर्करा योगच! त्यानं रुग्णाला Faith Healingचाही अनायासे लाभच होतो. अनेकदा रुग्णावरच्या औषधोपचारामधे विज्ञान जिथे हात टेकतं तिथेच डॉक्टरांचं आश्वासक व्यक्तिमत्वही काहीतरी अगम्य असा चमत्कार करुन जातं.

पोलिस खातं, सैन्यदल यासारखी संरक्षण खाती म्हटली की उंचापुरा देह, ही एवढीमोठ्ठी छाती, गलमिश्या आणि धारदार-भारदस्त आवाजाची मंडळीच डोळ्यांपुढे येतात. डॉक्टर म्हटलं की रुबाबदार, गोरागोमटा, नाकावर येणारा सोनेरी काड्यांचा चष्मा, कडक इस्त्रीचे फॉर्मल्स्, पायात चकचकीत काळे लेदर बूट्स, मितभाषी आणि आवाजामधे मार्दव अशीच छबी दिसायला लागते. त्यामुळे डॉक्टर कसा असावा? त्याचं वागणं-बोलणं-रहाणीमान कसं असावं? त्यानं समाजात आपलं स्थान कसं निर्माण करावं? या सगळ्या प्रश्नांचं under-one-roof उत्तर हवं असेल तर माझा बालमित्र डॉ. कृष्णा बलदवाकडे पहावं. उंचापुरा-गोरापान, डोळ्यांवर चष्मा, चेह-यावर सदैव हास्य, वागणं-बोलणं आणि देहबोलीमधे कमालीचा आत्मविश्वास असं सगळं एकाठायी त्याला लाभलंय. माझी पक्की खात्री आहे की त्याच्या केबिनमधे प्रवेश करताक्षणीच त्याच्या या आत्यंतिक आश्वासक व्यक्तिमत्वामुळे कोणत्याही रुग्णाचा आजार निम्मा पळून जात असणार. धुळ्याच्या गव्हर्नमेंट् मेडिकल् कॉलेजमधून शिक्षण घेऊन बाहेर पडल्यावर त्यानं मुंबईच्या 'बॉम्बे हॉस्पिटल्' आणि 'जे. जे. हॉस्पिटल्' यासारख्या नामवंत वैद्यकीय संस्थांमधे अनुभव घेतला. अस्थमा आणि ऍलर्जी आणि डायबिटीस या विषयामधे तज्ञ म्हणून त्यानं आज नावलौकीक कमावला आहे. दादा माणूस आहे तो त्याबाबतीत!

या सगळ्या status quo च्या पार्श्वभूमीवर लाजरा-बुजरा, कोणामधेही फारसा न मिसळणारा पण एकदा का एखाद्याशी मैत्री झाली की मग हातचं काहीही राखून न ठेवणारा आणि चेह-यावर नेहमीच एक मिष्कील हास्य असलेला शाळेतला (१९७९ सालच्या आमच्या इयत्ता पहिलीपासून आज २०१६ पर्यंत अखंड पहातोय मी त्याला) कृष्णा मला जसाच्या तसा आठवतोय. फक्त व्यक्तिमत्वाचाच विचार केला तर 'तेंव्हाचा कृष्णा' आणि 'आजचा कृष्णा' यात अक्षरशः जमिन अस्मानाचं अंतर आहे...मात्र अजिबात बदल घडलेला नाहीये तो त्याच्या स्वभावात...आजही तो तेवढाच दिलखुलास आहे, एक प्रथितयश डॉक्टर असल्याचं सोशल् स्टेटस् बाजूला सारुनच आजही तो माझ्यासारख्या बालमित्रांमधेही तेवढाच रमणारा आहे.

त्याच्या बोलण्याची सुरुवात होते तिच मुळी खास कृष्णा पेटंट् "काय समीर...? कसा आहेस...?" या वाक्यानं...यात कधीही बदल घडत नाही...फक्त समोरच्या व्यक्तिपरत्वे नावं बदलत जातात...बाकी सगळं तेच...बोलण्यात गेली ३७ वर्षे तोच आपलेपणा, तोच स्नेह...त्यात अर्धा टक्काही घट झालेली नाहीये...

देवबाप्पाची करामत काय आहे कळत नाही...मी जेंव्हा माझ्या व्यक्तिमत्वाचा (कश्याचं डोंबलं व्यक्तिमत्व हो ते पण आता दुसरा शब्द आठवत नाहीये म्हणून वापरलाय) विचार करतो, तेंव्हा वाटतं 'च्यायला हाताला लागेल त्या जिनसा कश्याबश्या एकत्र कोंबून देवानं मला बनवलंय' (या बाबतीत अक्षरशं 'बनवलंय' हो मला देवबाप्पानं). आणि कृष्णासारखी रुबाबदार मंडळी जेंव्हा माझ्यासमोर येऊन उभा रहातात तेंव्हा तर माझ्या 'ध्यानाची' मला फारच प्रकर्षाने जाणिव होते हो...पण करता काय...?

कुठे माझ्यासारख्यांचा ऊन-वारा-पाऊस यातल्या कश्यालाही न जुमानणारा तो पक्का वर्ण, वयाची चाळीशी येण्याच्या आतच केसांनी काढता पाय घेतलेलं असल्यानं चकचकीत झालेलं मस्तक आणि उलटपक्षी कुठे कृष्णासारखी शरीर आणि मनानंही देखणी असलेली माणसं! काहीजणांना तो एवढं रुबाबदार कसं काय निर्माण करतो हे केवळ त्या एका परमपित्यालाच ठाऊक बुवा! बरं, नुसतं रुबाबदारच नाही तर आपल्याला कोणते कपडे शोभतात याचाही माझ्या या बालमित्रासारखा काहीजणांना acute sixth sense ही कसाकाय असतो तेही नाकळे! हा मला अजून सांगत नाहीये पण त्याला नक्कीच मॉडेलिंगच्या ऑफर्सही येऊन गेलेल्या असणार आहेत. रेमंड्स, दिगजॅम्, अरविंद मिल्स्, उंची शेव्हिंग क्रिम्स् किंवा अत्तरं यासारख्या उत्पादनांच्या जाहिरातींमधे तो अगदी सहजपणे शोभून दिसेल.

वरकरणी extrovert वाटणारा हा माझा डॉक्टर मित्र मनानं मात्र अत्यंत कुटुंबवत्सल आहे...हे मी माझ्या या ३५ वर्षं चष्मा लावलेल्या डोळ्यांनी पाहिलेल्या अनुभवानं सांगतोय...चक्षुर्वैसत्यम्...सारानं कि-बोर्ड आणि सार्थकनं गिटारमधे प्राविण्य मिळवावं यासाठी त्या दोन लेकरांएवढाच झटणारा, कष्ट घेणारा, हळूवार हृदयाचा एक बाप मला नेहमीच कृष्णामधे लपलेला दिसतो. त्या दोघांच्या कलेला वाव मिळावा यासाठी त्यांना स्टेज् देताना तो जी धावपळ करत असतो तीही मी पहात असतो. त्या दोघांचंही वादन मी ऐकलंय आणि त्यामुळे छातीठोकपणे सांगता येतंय की ती दोन गुणी बाळंपण कनवाळू हृदयाच्या आपल्या पित्याच्या या प्रयत्नांना भरभरुन साथ देत असतात.

प्रिय बालमित्र कृष्णा...
ऋग्वेद संहितेमधे वर्णन केल्यानुसार, त्या भगवंताच्या विराट रुपाला हजारो मस्तकं, तेवढेच नेत्र अन् पाय आहेत...सहस्त्रशीर्षा पुरुषः सहस्त्राक्षः सहस्त्रपात्...आणि त्याच हजारो नेत्रांनी त्याची तुझ्यावर, रुग्णांसाठी काळ-वेळेचंही भान राखून न ठेवता झटून काम करणा-या तुझ्यातल्या डॉक्टरवर, सारा-सार्थकसाठी असलेल्या प्रेमळ बापावर आणि सौ. वहिनींच्या आदर्श पतीवर अखंड कृपादृष्टी ठेवावी हेच माझं अंतःस्थ मागणं आहे बघ! तुला तुझ्या कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

(समीर अनिल थिटे)

Catalytic Agent: Thy name is संजय गांधी





सर ह्युम मेमोरियल चर्चच्या पाठीमागे असलेल्या संजूच्या घरी आजवर अगणितदा गेलोय...निळा रंग दिलेलं, लाकडी दार असलेलं त्याचं जुनं घर अजूनही माझ्या स्मरणामधे तेवढंच ताजंतवानं आहे...उन्हाळ्यातल्या भल्या पहाटे उघड्या खिडकीतून वा-याच्या झुळुकेनं जाणवलेला रात्रीच कधीतरी फुललेल्या प्राजक्ताचा सुगंध जसा दिवसभर आठवत रहातो ना अगदी तस्संच...

दारातच स्वागताला आई बसलेल्या असतात. राजस्थानी पद्धतीनं मी त्यांना आदरपूर्वक 'बाई' म्हणतो. पाया पडलं की बाई दोन्हीही हात वर करुन भरभरुन आशिर्वाद देतात. लहानपणी संजूच्या घरी गेलं की बाई पटकन् भेळ करुन द्यायच्या...लालभडक रसरशीत टोमॅटोंचे काप, बारीक चिरलेला कांदा, वर कोथिंबीरीची पेरणी आणि उन्हाळ्यात कैरी असला ऐवज घातलेला भन्नाट प्रकार असायचा तो...सोन्याला 'ऐवज' म्हणायची पद्धत आहे...पण बाईंच्या हातानं आमच्या त्यावेळच्या चिमुकल्या भुकेला तृप्त करणारा हादेखिल ऐवजच...दुसरं काय?

आता या संजूबद्दल म्या पामरे काय बोलावं...? 

याचा वाढदिवसच मुळात १५ ऑगस्टचा...मातृभूमीच्या स्वतंत्रतेच्या दिवसाचा...आणि याचा स्वभावही तसाच सक्षमपणे झगडण्याचा...त्यामुळे त्याला 'संजय' म्हणायचं का 'सक्षम' म्हणायचं हा माझ्यापुढ्यात असलेला नेहमीचाच गहन प्रश्न...

४-५ वर्षांपूर्वी आमच्या सुमारे ४००-४५० मित्रमैत्रिणींना २० वर्षानंतर एकत्र आणण्यात याचा सिंहाचा वाटा (यापुढे इतर उपमा नाहीये म्हणून सिंहावरच थांबावं लागतंय हे माझ्या लेखणीचं दुर्दैव दुसरं काय)...आणि त्यादिवसापासून तो या ना त्या निमित्तानं आम्हाला एकत्र आणतोच आहे...अनेकदा तर खिश्यालाही झळ पोहोचते त्याच्या...पण चेह-यावरचं हसू काही कधी मावळताना दिसत नाही. साधारणपणे सव्वापाच ते साडेपाच फूट उंचीच्या त्याच्या किरकोळ देहात हृदय मात्र प्रचंड मोठं निर्माण करुन ठेवलंय बरं देवानं...I'm not talking about a biological heart हे इथे निराळं सांगायची आवश्यकता नाहीच. माझ्यासारख्या सामान्यांसाठी ऑक्सिजन् हा प्राणवायू...पण संजूसाठी 'मैत्री' हाच श्वास आणि तोच त्याचा एकमेव ध्यास...

मित्रांसाठी याची सतत धावधाव-राबणं आपलं सुरुच असतं. फोनवर फोन अन् SMS सोडत अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात याचा कायमच पुढाकार! प्रत्येकाकडे याचं बारीक लक्ष...प्रत्येकाच्या सवयी-आवडीनिवडी डोळ्यात तेल घालून जपणार हा...आम्ही विसरुन जातो पण कोणत्याही मित्रमैत्रिणीचा वाढदिवस याला पक्का ठाऊक...कार्यक्रमाच्या मिटींगसाठी कोल्ड्रींक-वडापाव-वेफर्सही न विसरता आणून ठेवणार हा...प्रत्येकाच्या सुख-दु:खाच्या प्रसंगीही हा पळणार...अत्यंत नि:स्वार्थी भावनेनं त्याचं हे सगळं चालू आहे.

तुझ्या पाठीवर आमच्या सगळ्यांची कौतुकाची एक थाप सदैव आहे हे ध्यानात ठेव रे मित्रा...

काम करुन नामानिराळं होणं फक्त संजूलाच जमू शकतं. 'मा फलेषु कदाचन' हा योगेश्वर श्रीकृष्णाचा गीतोपदेश अंमलात आणण्याचाच त्यानं जणूकाही विडा उचललाय की काय कोणास ठाऊक...मात्र सत्काराचा प्रसंग आला की नेमकं त्याचवेळी अदृश्य होण्याची दैवी शक्तीही त्याला साधलीये हे गुपितदेखिल जाताजाता तुम्हाला सांगतो. त्याची ही अशी दिव्यदृष्टी पाहून महाभारतातला संजय तो हाच का असाही प्रश्न मला अनेकदा पडतो.

एक छान योगायोग असा की आमच्या या बालमैत्रीनं आता पुढच्या प्रवासाला सुरुवात केलीये कारण त्याचा लेक श्रवण आणि माझा गंधर्व हे बालवाडीपासूनच (मराठीत त्याला आता लोअर के.जी. म्हणायला लागलेयत्) एकाच शाळेत...एकाच बाकावर बसणारे आणि एकाच ताटात जेवणारे मित्र आहेत तेही दोघं...जेंव्हाजेंव्हा मी श्रवण-गंधर्वला एकत्र पहातो तेंव्हा डोळे आणि ऊर दोन्हीही भरुन येतात...पुढच्या पिढीनंही बापांच्या मैत्रीची दोरी घट्ट विणून ठेवल्याचा रास्त अभिमानही वाटतो. 

रसायनशास्त्रातल्या catalytic agent सारखा आहे आमचा संजू...त्याच्याशिवाय आमचा ग्रुप 'पूर्णतः' अपूर्ण (छानच oxymoron सुचलाय हो हा) आहे. 

सरड्याची धाव कुंपणापर्यंतच असल्यानं संजूबद्दल लिहिताना माझ्या या लेखणीचीही मर्यादा एवढीच...कारण त्याच्याबद्दल असं चारपाचशे शब्दांमधे लिहणं केवळ अशक्यप्रायच...

संजू...तुझ्यासाठी काय मागू मी...? मी फक्त एवढीच प्रार्थना करु शकतो की ज्याचं हृदय larger than life आहे अश्या तुझ्यासारख्या माणसाकडे देवानं जातीनं विशेष लक्ष पुरवावं...
(समीर अनिल थिटे)