Thursday, June 16, 2016

'वादळापूर्वीची शांतता म्हणजे आमचा योगेश चव्हाण'





योगेश आणि मी चौथीपर्यंत वेगवेगळ्या शाळेत होतो. तो होता विश्रामबागेत तर मी नवीन मराठीत...पण अभिजित (ढाकेफळकर) आणि तो पहिलीपासून एकाच शाळेत - एकाच वर्गात असल्यानं त्याचं अभिजितकडे नेहमी येणंजाणं असायचं. त्यामुळे आमच्या मैत्रीत शाळा निरनिराळ्या असण्याचा अडसर कधीही नव्हता. तो, मी, अभिजित आणि नितीन शुक्ल क्रिकेट खेळण्याच्या निमित्तानं सतत भेटायचो. पाचवीपासून तर मग आमच्या सगळ्यांच्या शाळाही एकच झाल्या. 

योगेशला 'वादळापूर्वीची शांतता' म्हणायला अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक म्हणजे त्याचा खतरनाक बॉलिंग स्पेल्! फक्त तीन ते चार पावलांचा रन्-अप् घेऊन तो हळूच पळत यायचा आणि वेस्ट इंडियन लिजंड् मायकेल होल्डींगसारख्याच उजव्या हाताचा दंड उजव्या कानाला स्पर्शून आदर्श शैलीत त्यानं एकदा का त्याच्या भात्यातला तो अमोघ यॉर्कर टाकला की बस्स्...भल्याभल्यांना 'दे माय धरणी ठाय' करुन सोडायचा तो...सळो की पळो व्हायचं योगेशच्या बॉलिंगपुढे...पण गंमत अशी की बॅट्समनची दांडी उडाली तरी हा आपला शांतच...जणू काही प्रतिस्पर्ध्याला आऊट करुन आपणच काहीतरी भलामोठा गुन्हा केलाय असा याचा विनम्र भाव...म्हणजे एकीकडे वादळ तर निर्माण करायचं पण पुन्हा त्यातून नामंनिराळं राहून 'आपण त्या गावचेच नाहीत' असं याचं वर्तन...शाळेतल्या हिवाळी सामन्यांमधे पळण्याच्या शर्यतीतलं याचं पहिल्या क्रमांकाचं प्रशस्तीपत्रकही अगदी पक्कं ठरलेलं असायचं...त्याचा खो खो - कोणाच्याही हाती न लागता त्याचं ते अखंड ७ मिनिटं पळणं ज्यांनी पाहिलंय त्यांनाच त्याच्या वीजेसारख्या चपळाईची कल्पना येऊ शकते...बास्केटबॉल तर त्याचा श्वासच होता...त्याचा Men’s Open National Basketball स्पर्धेतला सलग तीनदा सहभाग...रत्न आहे आमचा योगेश म्हणजे...

तेंव्हापासून योगेश अजूनही आमच्या शाळेसमोरच रहातोय. त्यामुळे कधीकधी सुट्टीत पाणी पिण्यासाठी त्याच्या घरी जायचा प्रसंगही यायचा. अनेकदा तो, अभिजित, मी आणि नेहमीच बारीक कटींग् ठेवणारा भारत (योगेशचा एक जिगरी दोस्त) योगेशच्या गच्चीवर पतंग उडवायला जमायचो. योगेशनं आपल्या पतंग उडवण्याच्या करामतीनं समोरच्याचा पतंग काटला तरीही खास नगरी पद्धतीनं 'ओय काप्पे' करुन हा कधीही ओरडत सुटलेला मी पाहिला नाही...तिथेही हा आपला शांतच...पुन्हा एकदा त्याची तिच 'वादळापूर्वीची (इथे नंतरची) शांतता'... 

अभ्यासातही पठ्ठया सदैव झक्क...याच्या वह्याही स्वच्छ आणि त्यांना नेहमीच खाकी रंगाची नेमस्तपणे कव्हर्स घातलेली (हा गुण कदाचित् त्यानं त्याचा मोठा भाऊ राहुलकडून घेतला असण्याची शक्यता अधिक आहे कारण राहुल सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंटमधे होता आणि तिथे वह्या पुस्तकांना खाकी कव्हर्सची सक्तीच असते)...योगेशचं अक्षर अगदी सुंदर या पठडीतलं नसलं तरीही Quite Readable...थोडक्यात काय तर एका स्कॉलरसाठी आवश्यक असलेले सर्व गुण त्याच्यामधे ठासून भरलेले...पण त्याच्या वागण्या-बोलण्यात ना कधी मला गर्व दिसला ना वृथा अभिमान मी कधी पाहिला. 

शाळा संपल्यानंतर आमची फारशी भेट झाली नाही पण नोकरीच्या निमित्तानं १९९५ साली एका बहुराष्ट्रीय कंपनीमधे आम्ही दोघंही रुजू झालो आणि आमच्या बालमैत्रीचं जणू एक नवं पर्वच सुरु झालं. तो होता 'व्ह्यू रुम' क्वालिटी इंजिनियर आणि मी 'वाईंडींग शॉप' क्वालिटी इंजिनियर...टेक्निकली साऊंड असल्यानं थोडक्या कालावधीतच त्यानं तिथेही आपला जम बसवला. दुपारच्या सुट्टीत एकत्र डबा खाणं आणि दर शनिवारच्या सुट्टीच्या दिवशी दिवसातून दोनदा क्रिकेट खेळण्यासाठी एकत्र जमणं पुन्हा एकदा सुरु झालं. १९९९ मधे मी राजिनामा देऊन बाहेर पडेपर्यंत ही मालिका अव्याहतपणे सुरु होती. 

परवा रविवारी मी, बायको आणि लेक बिग् बझारमधे काही खरेदीसाठी गेलो होतो. तिथे बापाच्या भूमिकेतला योगेश भेटला...त्याला हाक मारण्याआधी मी त्याचं निरिक्षण करत होतो...त्याचा लेक 'ओम' आणि कन्या 'लावण्या' यांचे हट्ट पुरवित चाललेला एक प्रेमळ बाप दिसला मला योगेशच्या रुपात...त्याला पाहून माझ्या मनात विचार आला, 'या गृहस्थाच्या स्वभावात...या माझ्या बालमित्रामधे काडीचाही बदल नाहीये की...तो पूर्वी जेवढा कमालीचा साधा होता तस्साच आजही आहे...त्याचा तो शांत 'Demeanor' आजही अगदी तस्साच आहे....'

योगेश...मित्रा...अस्साच रहा...तुझ्या साधेपणातला मनाचा मोठेपणा मला फारफार भावतो रे...हाक मारली की मदतीला तात्काळ धाऊन जाणारं तुझं विशाल मन मी फारफार जवळून पाहिलंय...ते तस्संच राहू दे...हे आई भवानी, हे आदिमाया जगदंबे माझ्या या साध्यासरळ मित्रासाठी तुझ्या चरणी शिरसाष्टांग दंडवत घालतोय गं...

(समीर अनिल थिटे)

No comments:

Post a Comment