Thursday, June 16, 2016


Catalytic Agent: Thy name is संजय गांधी





सर ह्युम मेमोरियल चर्चच्या पाठीमागे असलेल्या संजूच्या घरी आजवर अगणितदा गेलोय...निळा रंग दिलेलं, लाकडी दार असलेलं त्याचं जुनं घर अजूनही माझ्या स्मरणामधे तेवढंच ताजंतवानं आहे...उन्हाळ्यातल्या भल्या पहाटे उघड्या खिडकीतून वा-याच्या झुळुकेनं जाणवलेला रात्रीच कधीतरी फुललेल्या प्राजक्ताचा सुगंध जसा दिवसभर आठवत रहातो ना अगदी तस्संच...

दारातच स्वागताला आई बसलेल्या असतात. राजस्थानी पद्धतीनं मी त्यांना आदरपूर्वक 'बाई' म्हणतो. पाया पडलं की बाई दोन्हीही हात वर करुन भरभरुन आशिर्वाद देतात. लहानपणी संजूच्या घरी गेलं की बाई पटकन् भेळ करुन द्यायच्या...लालभडक रसरशीत टोमॅटोंचे काप, बारीक चिरलेला कांदा, वर कोथिंबीरीची पेरणी आणि उन्हाळ्यात कैरी असला ऐवज घातलेला भन्नाट प्रकार असायचा तो...सोन्याला 'ऐवज' म्हणायची पद्धत आहे...पण बाईंच्या हातानं आमच्या त्यावेळच्या चिमुकल्या भुकेला तृप्त करणारा हादेखिल ऐवजच...दुसरं काय?

आता या संजूबद्दल म्या पामरे काय बोलावं...? 

याचा वाढदिवसच मुळात १५ ऑगस्टचा...मातृभूमीच्या स्वतंत्रतेच्या दिवसाचा...आणि याचा स्वभावही तसाच सक्षमपणे झगडण्याचा...त्यामुळे त्याला 'संजय' म्हणायचं का 'सक्षम' म्हणायचं हा माझ्यापुढ्यात असलेला नेहमीचाच गहन प्रश्न...

४-५ वर्षांपूर्वी आमच्या सुमारे ४००-४५० मित्रमैत्रिणींना २० वर्षानंतर एकत्र आणण्यात याचा सिंहाचा वाटा (यापुढे इतर उपमा नाहीये म्हणून सिंहावरच थांबावं लागतंय हे माझ्या लेखणीचं दुर्दैव दुसरं काय)...आणि त्यादिवसापासून तो या ना त्या निमित्तानं आम्हाला एकत्र आणतोच आहे...अनेकदा तर खिश्यालाही झळ पोहोचते त्याच्या...पण चेह-यावरचं हसू काही कधी मावळताना दिसत नाही. साधारणपणे सव्वापाच ते साडेपाच फूट उंचीच्या त्याच्या किरकोळ देहात हृदय मात्र प्रचंड मोठं निर्माण करुन ठेवलंय बरं देवानं...I'm not talking about a biological heart हे इथे निराळं सांगायची आवश्यकता नाहीच. माझ्यासारख्या सामान्यांसाठी ऑक्सिजन् हा प्राणवायू...पण संजूसाठी 'मैत्री' हाच श्वास आणि तोच त्याचा एकमेव ध्यास...

मित्रांसाठी याची सतत धावधाव-राबणं आपलं सुरुच असतं. फोनवर फोन अन् SMS सोडत अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात याचा कायमच पुढाकार! प्रत्येकाकडे याचं बारीक लक्ष...प्रत्येकाच्या सवयी-आवडीनिवडी डोळ्यात तेल घालून जपणार हा...आम्ही विसरुन जातो पण कोणत्याही मित्रमैत्रिणीचा वाढदिवस याला पक्का ठाऊक...कार्यक्रमाच्या मिटींगसाठी कोल्ड्रींक-वडापाव-वेफर्सही न विसरता आणून ठेवणार हा...प्रत्येकाच्या सुख-दु:खाच्या प्रसंगीही हा पळणार...अत्यंत नि:स्वार्थी भावनेनं त्याचं हे सगळं चालू आहे.

तुझ्या पाठीवर आमच्या सगळ्यांची कौतुकाची एक थाप सदैव आहे हे ध्यानात ठेव रे मित्रा...

काम करुन नामानिराळं होणं फक्त संजूलाच जमू शकतं. 'मा फलेषु कदाचन' हा योगेश्वर श्रीकृष्णाचा गीतोपदेश अंमलात आणण्याचाच त्यानं जणूकाही विडा उचललाय की काय कोणास ठाऊक...मात्र सत्काराचा प्रसंग आला की नेमकं त्याचवेळी अदृश्य होण्याची दैवी शक्तीही त्याला साधलीये हे गुपितदेखिल जाताजाता तुम्हाला सांगतो. त्याची ही अशी दिव्यदृष्टी पाहून महाभारतातला संजय तो हाच का असाही प्रश्न मला अनेकदा पडतो.

एक छान योगायोग असा की आमच्या या बालमैत्रीनं आता पुढच्या प्रवासाला सुरुवात केलीये कारण त्याचा लेक श्रवण आणि माझा गंधर्व हे बालवाडीपासूनच (मराठीत त्याला आता लोअर के.जी. म्हणायला लागलेयत्) एकाच शाळेत...एकाच बाकावर बसणारे आणि एकाच ताटात जेवणारे मित्र आहेत तेही दोघं...जेंव्हाजेंव्हा मी श्रवण-गंधर्वला एकत्र पहातो तेंव्हा डोळे आणि ऊर दोन्हीही भरुन येतात...पुढच्या पिढीनंही बापांच्या मैत्रीची दोरी घट्ट विणून ठेवल्याचा रास्त अभिमानही वाटतो. 

रसायनशास्त्रातल्या catalytic agent सारखा आहे आमचा संजू...त्याच्याशिवाय आमचा ग्रुप 'पूर्णतः' अपूर्ण (छानच oxymoron सुचलाय हो हा) आहे. 

सरड्याची धाव कुंपणापर्यंतच असल्यानं संजूबद्दल लिहिताना माझ्या या लेखणीचीही मर्यादा एवढीच...कारण त्याच्याबद्दल असं चारपाचशे शब्दांमधे लिहणं केवळ अशक्यप्रायच...

संजू...तुझ्यासाठी काय मागू मी...? मी फक्त एवढीच प्रार्थना करु शकतो की ज्याचं हृदय larger than life आहे अश्या तुझ्यासारख्या माणसाकडे देवानं जातीनं विशेष लक्ष पुरवावं...
(समीर अनिल थिटे)

No comments:

Post a Comment