Thursday, June 16, 2016


उमाळ्याचं प्रेम करणारा प्रशांत सदाफुले





काही काही माणसांनी चुकीच्या काळात जन्म घेतलाय असा माझा ठाम विश्वास आहे... अगदी खुंटी हलवून हलवून पक्का झालेला. त्यात प्रशांतचं नाव अग्रणी...'कोणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही' हा त्याचा स्वभाव त्यानं आजही जपून ठेवलाय. जे काम पुढ्यात येईल ते brutal honestyनं करुन मोकळं व्हायचं हे याचं व्यावसायिक सूत्र! ते प्राणापलिकडे पाळतो तो...त्यानं केलेली कामं पाहिली की हे याला सुचतं तरी कसं या विचारानं थक्क व्हायला होतं. हा जर एखाद्या मोठ्या शहरात असता तर आज आहे त्याहून त्यानं कितीतरी अधिक नावलौकीक कमावला असता.

कलागुणांच्या बाबतीत त्याच्या पासंगालाही पुरणार नाहीत अश्या मंडळींनी जेंव्हा आकाशएवढं यश मिळवलेलं मी पहातो, तेंव्हा माझ्या या सरळमार्गी मित्राबद्दल मला 'आत' वाईट वाटायला लागतं. योगायोगानं आमचे व्यवसायही काहीसे समान असल्यानं मला ते पहावं लागतं आणि म्हणूनच अधिक प्रकर्षानं खुपतंही. 

मिशनरी बापाच्या पोटी जन्म घेतल्यामुळे बहुतेक आयुष्य चीनमधे जगलेली प्रख्यात अमेरीकन लेखिका पर्ल बकनं जे काही लिहिलंय ते इतकं आनंद देणारं आहे की त्यामुळे माझे सर्वाधिक आवडते लेखक रविंद्र पिंगे त्या विदुषीला 'फुलं वाटणारी पर्ल बक्' असंच म्हणतात. हा प्रशांतही तस्साच आनंदाची फुलं वाटणारा आहे...सुयोग कसा आहे पहा ना की त्याच्या नावातही फुलंच आहेत...नावासारखाच 'सदाफुले' आहे तो...!

आता त्या दिवशीच्या सक्काळचंच उदाहरण देतो...साडेदहा वाजता त्यानं माझ्या ऑफीसच्या दारावर टकटक केलं आणि आत आला तोच मुळी हातात ही भलीमोठ्ठी पिशवी घेऊन...त्यामधे गरमागरम जिलेबी, गुलाबजांब आणि नुसत्या नावानंच तोंडातल्या सगळ्याच्या सगळ्या पाईपलाईन्स फोडणारा फाफडा होता. एक किलो गुलाबजांब फक्त माझ्यासाठी होते आणि वर आग्रह करुनकरुन मला त्यानं फाफडा-जिलेबी चाखायला लावलीच. कारण काय...? काहीही नाही...मित्राला 'खिलवावं' (खास तब्बेतशीर नागपुरी शब्द आहे हा) वाटलं त्याला म्हणून आला घेऊन...साष्टांग दंडवत रे बाबा तुझ्या या जिंदादिलीला...

पहिल्यापासून प्रशांत स्वभावानं तसा लाजराबुजराच आहे. शाळेत असताना, वयापेक्षा उंची जास्त वाढल्यानं तो चालायचाही खांद्यातून वाकूनच...डोळ्यांवर चंदेरी चष्मा आणि दहावीत असूनही खाकी हाफ चड्डीच घालावी लागत्येय यातलं अवघडलेपण आणि मनस्वी चीड मला त्याच्या body languageमधे सदैव दिसायची. पण याच लाजराबुज-या प्रशांतनं एकदा का हातात ब्रश घेतला की त्याची 'समाधीसाधन संजीवन नाम' अशी अवस्था होऊन जायची. काय एकाग्र व्हायचा तो चित्रं काढताना...! जणू काही शरसंधानासाठी सज्ज अर्जुनाला जसा फक्त त्या पोपटाचा डोळाच दिसत होता तसंच प्रशांतच्याही लेखी आजूबाजूचं जग नाहीसं व्हायचं आणि उरायचा तो फक्त मांडीवर ठेवलेला पांढराशुभ्र कागद, हातातला ब्रश आणि समोर मांडून ठेवलेली रंगपेटी! सुरु व्हायची मग त्याची ती दिलखुलास रंगपंचमी...पडवळ सरांचा आवडता विद्यार्थी काय उगीचंच होता होय तो... 

प्रशांतच्या निर्मळ मनाचा प्रत्यय त्याच्या एका वाढदिवसाला आलाच होता. निमित्त होतं त्याच्या वाढदिवसाचं...सकाळी एक टप्पोरा गुलाब त्याला नेऊन दिला तर हा गळ्याला पडून रडायला लागला. माणसं खोटंखोटं-कसंनुसं हसू शकतात. पण जेंव्हा हृदयाला काहीतरी खूप दुःख किंवा अत्याधिक आनंद देतं तेंव्हाच रडणं शक्य असतं. डोळ्यातले अश्रू बरंच काही बोलून जातात...'शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलिकडले' असं सामर्थ्य आहे त्यांचं... 

आई म्हणजे तर प्रशांतचं परमदैवत...'न मातुः पर दैवतम्' हे सुभाषित जगताना पहातोय मी त्याला...त्या दिवशी त्यानं माझी ओळख करुन दिली तेंव्हा ती माऊली सडासंमार्जन केलेल्या अंगणामधे पवित्र अशी रांगोळी काढत होती. काकूंचा प्रसन्नवदन चेहरा शांतपणा, सोशिकपणा, संस्कार या गुणत्रयींच्या ज्या मिश्रणानं मला दिसला त्याचाच तर वारसा त्यांचा हा लेक पुढे चालवतोय...

मित्रा, पण खंत एवढीच की तू समजतोस ना तेवढं जग सरळ नाहीये रे...थोडीशी चतुराई शिक...पण नकोच... जाऊदेत...तू आत्ता जसा आहेस तसाच रहा...असाच सरळमार्गानं जग...कारण तुझ्यासारख्या 'नेकदिल' माणसांचा सांभाळ करायला 'तो' बसलाय ना आकाशात...तुझ्यासाठी माझी सगळीसगळी भिस्त त्याच्यावरच आहे...बाप्पा, या माझ्या परममित्रावर तुझी 'मेहेरनजर' अशीच नित्य असू देत बरं...

(समीर अनिल थिटे)

No comments:

Post a Comment