Thursday, June 16, 2016


'दुरुन डोंगर साजरे' अमान्य असणारे चारुदत्त जोशी, सौरभ मिरीकर, राहुल देशपांडे आणि प्रसाद शेटे




आपल्या म्हणी आणि वाक्प्रचार किती छान आहेत नाही. आता याचंच उदाहरण घ्या ना 'दुरुन डोंगर साजरे' किंवा Mountain looks blue from distance...जी गोष्ट लांबून साजिरी-गोजिरी वाटते ती जवळून तितकीशी वाटेलच असं नाही...अनेकदा तर ती अशक्यप्राय, भयावहदेखिल वाटते. 

पण मला असे चार महापुरुष माहिती आहेत की जे ही म्हणच बहुतेक विसरलेयत्. दुरुन साजणारे ते डोंगर, त्या द-या, कडेकपारी, माळरानं-जंगलं, आडवाटा जवळ गेल्यानंतर कधीकधी एवढी भीषण वाटू लागतात की काहीकाहींची भंबेरीही उडताना मी पाहिलीये. पण या चौघांना त्याचं ना सोयर ना सुतक! पक्के प्रवासी आहेत हे चौघंहीजण...पण Wandering one gathers honey या उक्तीनुसार त्यांनी या प्रवासात असा काही 'मध' संग्रहीत करुन ठेवलाय की जर त्यांच्या तोंडून या प्रवासातले निरनिराळे किस्से, गंमती ऐकायला बसलं तर वेळ कसा भुर्रकन् उडून जातो तेही कळत नाही. 

'
दिसामाजी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडीत वाचित जावे' असा समर्थ रामदास स्वामींचा सल्ला शिरोधार्ह मानून लेखणी घासून पोटं भरणारी माझ्यासारखी मंडळी सतत पांढ-यावर काळं करत सुटतात. समर्थांचा हाच सल्ला चारु, सौरभ, राहुल आणि प्रसाद यांनी स्वतःसाठी थोडासा modify करुन घेतलाय तो असा 'दिसामाजी काही नवे ते पहावे, प्रसंगी अखंडीत प्रवासा निघावे'. 

चारुदत्त जोशीची आई आणि माझी आत्या या जवळच्या मैत्रिणी...आत्यासोबत काकूंचं आमच्या घरी नित्य येणंजाणंही होतं. त्यामुळे शाळेआधीच माझी चारुशी मैत्री झाली. त्याही वयात उंचापुरा असलेला चारुदत्त घरी येऊन गेला की माझ्या पोटात भलामोठ्ठा गोळा यायचा. मग आजीचा एक धपाटा मला खावा लागे आणि सोबतच तोंडीलावणं म्हणून घरातल्या प्रत्येकाकडून मला नाहीनाही ते ऐकावं लागे - माझा उद्धार करण्याची संधी कोणीही हातची जाऊ देत नसे, "अरे बघ जरा त्या चारुकडे...तुझ्याच वयाचा ना तो...बघ कसा उंचापुरा न् दणकट आहे तो...नाहीतर तू...दर चार दिवसांनी आहेच लेले डॉक्टरांकडे तुला घेऊन जाणं...पायच दुखतायत्, हातच दुखतायत्...सतत चालूच तुझं काहीतरी..." त्यामुळे आईसोबत घरी आलेला चारु पाहिला की मी लपूनच बसायचो. 

'
आरोग्यम् धनसंपदा' वगैरे मला फारसं मानवणारं नसल्यानं व्यायामाचा मला पहिल्यापासूनच भयंकर कंटाळा आहे. पण सौम्यानं "दिवसभरातून तासभर तरी व्यायाम केलाच पाहिजेस" अशी ताकीदच देऊन ठेवल्यामुळे तिच्या समाधानासाठी दर संध्याकाळी मी उगीचच इकडेतिकडे तासभर उंडारुन येतो आणि त्यालाच व्यायाम म्हणतो. अश्याच एका संध्याकाळी मी पाईपलाईन रोडनं पायी भटकत असताना अचानक कानावर जोरदार "सम्या" अशी हाक आली...मनातच म्हटलं 'हा चारुचाच आवाज'...आणि झालंही तसंच...व्यायामाबाबतीत मला मुळातच उल्हास, त्यात फाल्गुनमास...त्यामुळे तिथे रस्त्यावरच चारुशी चांगल्या अर्धातास मनसोक्त गप्पा झाल्यानंतर घाम पुसत घरी आल्याचं नाटक करायला भलतीच गंमत आली राव त्या दिवशी...

चारुला भूगोलामधे उत्तम गती होती. मतलई (की मतलबी), व्यापारी या नावांचे ते वा-यांचे प्रकार, कटीबंध, अक्षांश, रेखांश, विषुव-मकर नावाची वृत्ते (दुष्ट वृत्ती कुठली त्यांची) असल्या भुगोलांच्या त्या प्रकारांचा मला शाळेत असताना प्रचंड धसका होता. पण मग मदतीला धाऊन यायचा चारु! परीक्षा जवळ आली की मी त्याच्या बाकावर जाऊन बसायचो आणि त्या महाभयंकर शब्दांशी झटापट करुन पदरात मार्कस् पाडून घ्यायचो. पुढे जाऊन हा एखाद्या कॉलेजात भुगोलाचा प्राध्यापकच होईल असं वाटलं होतं, पण यानं प्राविण्य मिळवलं संगणकात! 

चारु आजही तस्साच आहे. त्याचा तो उंचपुरा देह, त्याला शोभून दिसणा-या भरघोस मिश्या, तजेलदार चेहरा, मित्रांचा हात हातात घट्ट धरुन ठेऊन बोलण्याची सवय यात काडीमात्रही बदल घडलेला नाहीये.

आजही माझ्या वाढदिवसाच्या दिवशी अगदी सक्काळीसक्काळी चारुचा फोन येतो तोच मुळी "सम्या" या संबोधनानं सुरुवात करत...या वीरानं नुकताच २३०० किलोमीटरचा लेहलद्दाख ते श्रीनगर असा बुलेट प्रवास केलाय. त्याचं अद्भुतरम्य, अंगावर काटा आणणारं वर्णन वाचायचं असेल तर अवश्य http://mybulletjourney.blogspot.in/ या दुव्यावर जा. जिद्दीपुढे निसर्गालाही नमतं घ्यायला लाऊन त्यावर विजय मिळवण्याची त्याची विजिगिषु वृत्ती कशी जिंकली याचं समग्र वर्णन आहे त्यामधे!

आता सौरभचं उदाहरण घ्या! आमच्या दोघांच्याही बालमैत्रीला एक सोनेरी किनार आहे ती आमच्या दोघांच्याही बाबांच्या बालमैत्रीची! सौरभचे बाबा (श्रीपादकाका), सुप्रसिद्ध रंगकर्मी कै. अनिल क्षीरसागर आणि माझे दिवंगत बाबा हे तिघंही बालमित्र! बाबा गेल्यानंतर बालमित्राला अखेरचा निरोप देण्यासाठी अमरधाममधे सर्वात आधी अगदी शांतपणे येऊन बसलेले होते श्रीपादकाका...प्रकृतीअस्वास्थ्यामुळे बालीकाकांना (कै. अनिल क्षीरसागर) येणं जमलं नव्हतं. अमरधाममधून बाहेर पडताना श्रीपादकाका माझ्याजवळ आले आणि माझ्या खांद्यावर हात ठेऊन माझ्या हातात त्या तिघांच्या मैत्रीबद्दल कमालीच्या उमाळ्यानं बालीकाकांनी लिहिलेलं पत्र ठेवलं. सलाम माझा त्या तिघांच्याही घट्टघट्ट बालमैत्रीला! 

सौरभचा जन्मच सरदार घराण्यात झालेला असल्यानं मनानंही तो अतिशय रईस...तिसरीत असताना आम्ही दोघं शेजारीच बसायचो. एकदा त्यानं शाळेत दत्तप्रभूंचं अत्यंत सुंदर चित्र असलेलं पॅड् (क्लिप् बोर्ड) आणलं होतं. मी दिवसभर त्या चित्राकडे हरखून पहात होतो. शेवटी शाळा सुटताना 'वंदे मातरम्' म्हणून झाल्यानंतर न रहावून मी फार धैर्यानं सौरभला म्हटलं, "सौरभ, चित्र किती छान आहे रे हे...!" मला काय म्हणायचंय हे त्याला कसं काय लक्षात आलं मला आजही कळत नाहीये...पण पुढच्याच क्षणी त्यानं ते नवं कोरं पॅड् माझ्या हातावर ठेवलं आणि म्हणाला, "घेऊन टाक...बक्षिस" पुढे कितीतरी वर्षं ते पॅड् माझ्या कपाटात मी न वापरता तसंच ठेऊन दिलं होतं. आईनं फारच आरडाओरडा केला आणि तो बाका प्रसंग त्याहून अधिक भीषण होऊ नये यासाठी सहा महिन्यातून एकदा कधीतरी मी माझं कपाट आवरायला काढायचो आणि त्यात सर्वात आत जपून ठेवलेलं ते पॅड् स्वच्छ पुसून पुन्हा जसंच्या तसं आत ठेऊन द्यायचो. आजही ते पॅड् अगदी जसंच्या तस्सं आहे...'माझ्या मनातल्या एका सुरक्षित कप्प्यामधे मी ते पॅड् अजूनही फारफार आपुलकीनं जपून ठेवलंय रे सौरभ...'

शेतकी विषयात एमएस्सी झालेल्या हरहुन्नरी सौरभचे प्रयोग त्याच्या मिरीच्या शेतात आजही चालू असतात. साधारणतः १९९९-२००० च्या दरम्यान त्यानं विकसीत केलेले mushrooms मी दर शनिवारी आणून ठेवायचो आणि रविवारी मनसोक्त चाखायचो. हाडाचा प्रवासी असलेला सौरभ आजही दर रविवारी सहकुटूंब पुण्याजवळची माळरानं-अरण्यं, टेकड्या-डोंगर, पठारांवर न चुकता खास त्याच्याच शब्दात वर्णन करायचं झालं तर 'forest trails' ला जात असतो. 

राहुल देशपांडे माझा नातेवाईक...पण मैत्रीमधे नातं नकोच आणायला...छान मैत्रीमधे नात्याची लुडबूड कश्श्याला उगाचंच बिनकामाची...! राहुल आणि त्याच्या काही सहका-यांनी मिळून 'मैत्री ऍडव्हेंचर्स' ही संस्था स्थापन केलीये आणि त्या क्षेत्रात ते फार भरीव कार्यही करतायत. रीव्हर क्रॉसिंग, रॅपलिंग, माऊंटेनियरींग, स्काय वॉचिंग असल्या नानाविध साहसकर्मांचं प्रशिक्षणही ते लहानमोठ्यांना देतायत. आधीच ते सरळसोट कडे पाहून मला गरगरायला लागतं आणि हा राहुल त्याला कुठे दोरखंड लाव, कुठे खिळे ठोक आणि जा त्यावरुन हेलकावे खात चढून असले अचाट पराक्रम करत असतो. 

अत्यंत शांतपणे कुठलाही गाजावाजा न करता याचं समाजकार्यही चालू असतं...एवढ्यातच तो सहकुटूंब ईशान्येकडे असलेल्या एका दुर्गम भागामधे राहून-समाजसेवा करुन परतलाय. दुर्गम म्हणजे किती दुर्गम असावा तो भाग...ऐकायचंय...मग राहुललाच भेटा आणि ऐका त्याच्याच मुखातून ती कहाणी... गरोदर स्त्री किंवा आजारी माणसालाही हमरस्त्यापर्यंत खांद्यावर उचलून आणावं लागतं तिथे…ऐकताना डोळे पाणावतील, शरीराला कंप सुटेल...आपलेच देशबांधव किती हालाखीच्या परिस्थितीत रहातायत ते ऐकल्यावर आपल्या घरात अनावश्यक जळणारे लाईट्स, खोलीत कोणीही नसताना गरागर फिरणारे पंखे अन् हमिंग् करणारे एसी, समोर कोणी पहात बसलेलं असो वा नसो तास न् तास जळणारे टिव्ही यांचं सुखही (याला सुख तरी कसं म्हणावं?) खुपायला लागेल...आपल्याच देशबांधवांना केवळ दोन वेळच्या अन्नासाठी किती कष्ट उपसावे लागतायत हे जर राहुलच्या वाणीतून ऐकलं की आपण किती घोरअपराधी आहोत या भावनेनं पुढ्यात आलेलं अन्नही गोड लागायचं नाही. मुळातच समाजसेवेमधे झोकून देऊन काम करणा-या कुटूंबातून आल्यामुळे सौ. वहिनींना ते बाळकडू होतंच पण अश्या या भागामधे जाऊन तिथे समाजसेवा करायला राहुलच्या लहानग्या लेकीनंही मागेपुढे पाह्यलं नाही याचं मला कोण कौतुक वाटतंय. 

प्रसाद शेटे आणि मी मागच्या ३१ डिसेंबरला तारकपूर एस्.टी. स्टॅन्डजवळच्या एका लहानग्या टपरीवर संध्याकाळी निवांतपणे चहा पित बसलेलो होतो. संध्याकाळची वेळ असल्यानं गार वारं तर होतंच पण त्यामुळेच हातातला वाफाळता चहा आणि सोबतीला गप्पांसाठी असलेला बालमित्र यामुळे भर उन्हाळ्यात सिग्नलवर थांबलेलं असताना शेजारच्या कोणीतरी वाळ्याचं अत्तर लावल्यावर आपल्या घ्राणेंद्रीयाला जी सुखद अनुभूती येते ना तशीच ती वेळही सुखद होती. तेंव्हा मला जाणवलं की हा प्रसाद आणि तो Shekhar Jape ही मंडळी काय चिरतरुण असल्याचं वरदान घेऊन आलेले आहेत की काय...? कारण त्यांच्या चेह-यावर चाळीशी पार केल्याची कोणतीही खूण दिसायला तयार नाहीये. मिश्यांमधे थोडेफार चंदेरी केस डोकवतायत् बस्स...त्याहून अधिक काही नाही...

निवांत गप्पा मारताना प्रसाद त्याच्या ट्रेक्समधल्या आठवणी सांगत होता...१९९० च्या दरम्यान नगरमधे गाजलेल्या ओंकार ट्रेकर्सचा प्रसाद खंदा सदस्य...भटकंती तर त्याच्या रोमारोमात भिनलेली आहे. आजही कळसूबाई-हरिश्चंद्रगड म्हणजे त्याच्यासाठी गुलमोहररोडला जाऊन भाजी घेऊन येण्यासारखं आहे. "चल रे माझ्यासोबत एकदातरी..." असं तो कित्येकदा म्हणालाय, पण माझ्यासारख्या मुलखाच्या आळशी माणसाला ते मानवणारं नसल्यानं मी आपला त्याच्या बोलण्याकडे सोयीस्कर काणाडोळाच करत असतो. 

आत्ता एवढ्यातच त्यानं बुलेट घेतल्यानं त्याच्या प्रवासाचं वारु चौफेर उधळलं नाही तरच नवल! प्रसादची गंमतच निराळी आहे...हा आमचा ह्यु-एन्- त्सॅन्ग् त्या नव्या को-याकरकरीत बुलेटची ट्रायल घ्यायला म्हणून नगरमधून जो बाहेर पडतो ते थेट खेड-मंचर-नारायणगाव-जुन्नर अशी 'छोटीश्शी' चक्कर मारुनच घरी परततो. 

लहानपणापासूनच चष्माबिष्मा लावणारी माझ्यासारखी माणसं वाटतात स्कॉलर पण आम्ही परीक्षांमधे करुन ठेवलेले उद्योग (हा माझा एक निराळाच Achille’s Heel आहे) आमच्या मित्रांना खडा न् खडा ठाऊक आहेत. अगदी तसंच आहे प्रसादचंही ... एकंदरीत प्रसादच्या साधारणच असलेल्या देहयष्टीकडे पाह्यलं तर त्याच्या या साहसीपणाची कल्पना नाही यायची. पण असंच असतं ना 'जे दिसतं ते नसतं'...

भीति हा शब्दच त्याच्या कोषात नाही. २४ तासांच्या कुठल्याही वेळेला आणि कुठेही प्रवासाला जायला हा एका पायावर तय्यार असतो. मला तर दाट संशय आहे, एक बॅग याच्या घरी कायम भरुनच ठेवलेली असणार. त्याच्यासारख्याच पायाला सतत भिंग-या लाऊन बसलेल्या मित्रांनी शिट्टी मारायचाच उशिर की निघाला हा भ्रमंतीला. निसर्गामधे जसे काही omnivorous (सर्वभक्षी प्राणी) असतात तसाच प्रसादलाही प्रवासाच्या बाबतीत काहीही चालतं एवढा तो त्याबाबतीत अतृप्त आहे. परमेश्वरानं दिलेले दोन पाय कमी पडतात म्हणून की काय कल्पना नाही पण दुचाकी म्हणू नका, चारचाकी म्हणू नका वेळ मिळाला की प्रसाद पाठीला पोतडी बांधतो, त्यात पाणी, खाण्याचे जिन्नस टाकतो आणि निघतो भ्रमंतीला...मनःपूर्वक प्रेम आहे त्याचं प्रवासावर...आहे की नाही जातिवंत फिरस्ता हा...!

गुणीजन असलेल्या अश्या या मित्रांची ही मांदियाळी पाहिली की वाटतं अमकं जर्नल् न् ढमकं रिव्ह्यू काय सांगत असतील ते असोत पण फाटक्या खिश्याचा माझ्यासारखा सामान्य माणूसच जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे. 

देवाधिदेवा, मला हे असं श्रीमंत करणा-या माझ्या या मित्रांना कधीही काहीही कमी पडू देऊ नकोस (आणि माझ्या या श्रीमंतीतही कधी उणीव ठेऊ नकोस)...


(
समीर अनिल थिटे)

No comments:

Post a Comment